Advertisement

नारायण राणेंना रोखण्यासाठी शिवसेनेची फिल्डींग


नारायण राणेंना रोखण्यासाठी शिवसेनेची फिल्डींग
SHARES

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना यापूर्वी दोनदा धुळ चारत त्यांचा चेंदामेंदा केला. त्यामुळे राणेंचं आव्हान आमच्यासमोर नाही, असं सांगणाऱ्या शिवसेनेने राणेंना रोखण्यासाठी कणकवलीत जोरदार फिल्डींग लावली आहे.

कणकवली-देवगड- वैभववाडी या मतदार संघात शिवसेनेचा आमदार नसल्यामुळे शिवसेनेने या मतदार संघावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच कणकवली नगरपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदार संघात आपलं बळ वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची स्फूर्ती वाढवण्यासाठी शिवसेनेने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.


काय आहे शिवसेनेची रणनिती?

कोकणातील सावंतवाडी आणि कुडाळ-मालवण हे दोन विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात असून केवळ कणकवली-देवगड-वैभववाडी हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे कोकणातील राणेंचं अस्तित्व संपवून कणकवली मतदार संघ अधिक मजबूतपणे बांधण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केला आहे. या मतदार संघात शिवसेनेचा आमदार निवडून आल्यास तळ कोकणातील तिन्ही मतदार संघांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल आणि राणेंचं अस्तित्वच संपुष्ठात येईल, अशी रणनिती शिवसेनेनेने आखली आहे.

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते व मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत ठाण मांडली आहेत. ही नगरपंचायत निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढत असून याची संपूर्ण जबाबदारी आमदार नितेश राणे  यांनी उचलली आहे. त्यामुळे या नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडून आल्यास राणेंची या तालुक्यातील ताकद पुन्हा वाढेल. या भीतीने शिवसेनेने राणेंना या नगरपंचायत निवडणुकीत रोखण्यासाठी विविध प्रकारची रणनिती आखली असून प्रसंगी भाजपाचीही मदत  घेऊन ते राणेंच्या पक्षाला ही नगरपंचायत मिळवू देणार नाही, असं बोलले जात आहे.


राणे शिवसेनेवर भारी

कणकवली येथे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, कुडाळ मतदार संघात राणेंना पराभूत तर केलंच आहे, शिवाय वांद्र्यात तर त्यांचा चेंदामेंदा केला आहे, असं सागत राणेंच्या पक्षाचीही खिल्ली उडवली. मात्र, एका बाजूला राणेंचं  आव्हान नसल्याच्या बाता ठोकायच्या आणि दुसरीकडे कणकवलीत शिवसेनेच्या या नेत्यांनी तळ ठोकून त्यांना रोखण्याची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एकटे राणे आजही शिवसेनेला भारी पडत असून त्यांना पराभव करण्यासाठी शिवसेनेला आपली पूर्ण ताकद पणाला लावावी लागत आहे.

राणे जर मंत्री झाले असते तर ते पुन्हा कोकणात मजबूत उभे राहून शिवसेनेच्या ताब्यात गेलेला मतदार संघही मिळवण्याचा प्रयत्न केला असता. पालकमंत्री दिपक केसरकर यांनाही पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली असती. त्यामुळे राणेंना मंत्रीपद देऊ नये, यासाठी शिवसेनेने  लावली फिल्डींग यशस्वी ठरली. त्यामुळेच त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांचा राज्याच्या राजकारणातून काटा काढण्याचाही प्रयत्न शिवसेनेने आणि पर्यायाने भाजपाने केल्याची दिसून येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा