राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडं मागणी


SHARE

ऑक्टोबर महिन्यात कोकणासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. यांसदर्भात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवनवर जाऊन भेट घेतली.

शेतकऱ्यांना मदत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आणि नवनिर्वाचीत आमदार आदित्य ठाकरे हे पावसाचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करणार आहेत. तसंच, शेतकऱ्यांना मदत करण्याचा आदेश शिवसैनिकांना देण्यात आला आहे. राज्यपालांच्या भेटीदरम्यान नियमांचा काथ्याकूट न करता बाधितांना मदत द्यावी, अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

कोकणात कयार वादळामुळं मच्छीमार, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ३२८ जनावरं मृत्युमुखी पडली. तर राज्यात विविध भागांत अवकाळी पावसामुळं भात, कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्षं आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी, पशुपालक, मच्छीमार अशा सर्वानाच मदतीची गरज असून त्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेतर्फे कोश्यारी यांना देण्यात आले.


हेही वाचा -

व्होडाफोन कंपनी भारतातील आपला व्यवसाय बंद करणार?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी १०२ दिवस बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या