Advertisement

शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा, भाजप नेत्यासोबत एकाच हाॅटेलात असल्याने चर्चांना उधाण


शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा, भाजप नेत्यासोबत एकाच हाॅटेलात असल्याने चर्चांना उधाण
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होऊन ५ दिवस उलटत नाही, तोच शिवसेनेचे राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा शनिवारी राजीनामा दिला. ते आपल्या आमदारकीचाही राजीनामा देतील अशी शक्यता आहे. खासकरून सत्तार ज्या हाॅटेलमध्ये मुक्कामाला आहेत, त्याच हाॅटेलमध्ये भाजप नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे देखील उपस्थित असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. सत्तार यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीआधी अब्दुल सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले होते. त्यांना सिलोडमधून उमेदवारी देण्यात आली होती. दुसऱ्या पक्षातून येऊन देखील सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. परंतु शिवसेनेकडून कॅबिनेटपदाचं आश्वासन मिळूनही दुय्यम दर्जाचं पद देण्यात आल्याने ते नाराज होते. त्यातच औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सत्ता काँग्रेसला देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने त्यांच्या अस्वस्थतेत भर पडली होती. त्यातूनच त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.

अनुभवाने ज्येष्ठ असूनही शिवसेनेकडून दुय्यम खातं मिळालं. शिवसेना नेते कुठलाही निर्णय घेताना विश्वासात घेत नाहीत. ज्या काँग्रेसमधून बाहेर पडून शिवसेनेत आलो त्याच काँग्रेस नेत्यांच्या शिवसेना नेते पायघड्या पडत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे ६ आमदार आणि जिल्हापरिषदेत १८ सदस्य असून काँग्रेसचा एकही आमदार नसताना तसंच जिल्हा परिषदेत केवळ १० सदस्य असताना काँग्रेसला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिल्यामुळे ते अस्वस्थ होते.

दरम्यान अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांची भेट घेऊन २० मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. परंतु या चर्चेतून काहीही निष्पण्ण झालं नाही. खोतकर हाॅटेलबाहेर पडताच हरिभाऊ बागडे यांनी हाॅटेलात प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा