Advertisement

“आमच्या रणरागिणी 'तिचं' थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत”

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, अशा शब्दांत प्रताप सरनाईक यांनी कंगनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“आमच्या रणरागिणी 'तिचं' थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत”
SHARES

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून शिवसेना नेते आणि कंगनामध्ये जोरदार जुंपली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील कंगनावर तोंडसुख घेतलं आहे. (shiv sena mla pratap sarnaik warned actress kangana ranaut over mumbai police comment)

कंगनाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, अशा शब्दांत प्रताप सरनाईक यांनी कंगनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला खुली धमकी दिली आहे. तसंच मला मुंबईत येऊ नये असंही बजावलं आहे. मला मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असं वक्तव्य कंगना राणावतने केलं होतं.

त्यावर मी कोणाचंही नाव घेणार नाही. पण जर कोणी म्हणत असेल मी धमकी दिली तर मी पोकळ धमकी देत नाही, ते काम माझं नाही, असली नौटंकी मी करत नाही. मी शिवसैनिक असून थेट कृती करतो. मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - ‘याला’ धमकी समजा वा सल्ला…, मनसेच्या ‘या’ नेत्याने दिला कंगनाला इशारा

तसंच मुंबईला पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा कोणत्याही व्यक्तीला इथं राहून मीठ खाण्याचा अधिकार नाही. ही मुंबई १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. १९९२ ची दंगल असो किंवा २६/११ चा दहशतवादी हल्ला मुंबई पोलिसांनी बलिदान देऊन लोकांना वाचवलं आहे. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगेरै लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही, वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

तर, दुसऱ्या बाजूला माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरून घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहे माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे, केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो, पाऊस असो... कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला या माझ्या मुंबई पोलिसांची भीती वाटते, त्यांनी खुशाल आपापल्या राज्यांत जाऊन असुरक्षित राहावं. ‘याला’ धमकी समजा वा सल्ला...माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं मीच काय कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असा इशारा मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगनाला दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा