शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर काय आले ते पुन्हा युतीच्या चर्चेला उधाण आलं. युती होणार, युतीसाठी रात्री गुप्त बैठका होत असल्यापासून ते येत्या दोन दिवसांत दोन्ही पक्षात युतीची चर्चा सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. पण या रंगलेल्या चर्चेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन दिवसांत युतीची चर्चा सुरू होणार असल्याचं वृत्त फेटाळतानाच संजय राऊत यांनी भाजपाला टोलाही लगावला आहे. भाजपाकडून युतीसाठी शिवसेनेला प्रस्ताव दिला जाणार असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. प्रस्ताव कसला देताहेत अस सवाल करतानाच आम्ही प्रस्ताव स्वीकारण्यासाठी काय मॅरेज ब्युरो उघडलाय का अशा शब्दात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
शिवसेनेकडून सातत्यानं स्वबळाची भाषा होत असताना दुसरीकडे भाजपाकडून मात्र युतीची, युतीच्या चर्चेची, एकत्रित निवडणूक लढवण्याचीच भाषा होत आहे. त्यामुळे युतीवरून सुरू असलेली चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरूच असून युतीकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान भाजपाकडून युतीसाठी प्रयत्न होत असताना शिवसेना मात्र युतीच्या मुद्यावरून भाजपाला नेहमीच टोलवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मित्रपक्षाला, शिवसेनेला पटकावण्याची भाषा करत धमकी वजा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेनं आक्रमक होत भाजपाला प्रत्युत्तर दिलं होतं. संजय राऊत यांनी तर हे प्रत्युत्तर देताना भाजपाला रोडरोमियो संबोधलं होतं. कितीदा सांगितलं तरी आमच्या मागे लागता, आमच्याशी लग्न करा म्हणता, रोडरोमियोसारखं मागं लागता, पण असं मागं लागणं कायद्यानं गुन्हा असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
यानंतर पुन्हा युतीवरूनच संजय राऊत यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. भाजपाकडून शिवसेनेला काही प्रस्ताव युतीसाठी दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत यासाठीची चर्चाही सुरू होणार असल्याचं वृत्त आहे. संजय राऊत यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. चर्चेच्या, प्रस्तावाच्या बातम्या आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत असं म्हणतानाच राऊत यांनी प्रस्ताव स्वीकारायला आम्ही काय मॅरेजब्युरो नाही, आम्ही मुंडावळ्या बांधून बसलेलो नाही असंही म्हटलं आहे. राऊत यांनी युतीच्या चर्चेचं वृत्त फेटाळलं असलं, या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला तरी राजकीय वर्तुळात मात्र युतीच्या चर्चेचं गुर्हाळ सुरूच आहे.
हेही वाचा -
काँग्रेसनं कंबर कसली, निवडणूक समित्या जाहीर
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी १०० कोटी देण्याला शोभा डेंचा विरोध