रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक झाल्यापासून भाजपा नेते महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करत आहेत. एवढंच नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकशाहीला लाज आणल्याचं म्हणत या अटकेचा निषेध केला. त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून अर्णब गोस्वामींची (arnab goswami)पाठराखण केली जातेय कारण ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ते नेहमीच त्यांच्या पक्षाची बाजू मांडत असतात. सामना हे जसं शिवसेनेचं मुखपत्र आहे, तसंच त्यांचं चॅनेल आहे. तो कदाचित भाजपाचा लाऊडस्पीकर असेल. म्हणूनच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी भाजपवाले उतरले असतील. पण त्याने कोणत्या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणि पोलीस कारवाई का करत आहे, हेसुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे.
हेही वाचा- नाईक प्रकरण कोणाच्या सांगण्यावरून दाबलं? काँग्रेसची चौकशीची मागणी
If someone is arrested under Sec 306 (abetment to suicide) & 307 (attempt to murder) & BJP wants to protest over it, they may do it as everyone has that right in democracy. But, I can ensure that injustice won't be done to anyone: Sanjay Raut, Shiv Sena on Arnab Goswami's arrest pic.twitter.com/EOBItVls3p
— ANI (@ANI) November 5, 2020
अर्णब गोस्वामी यांच्यावर पत्रकार म्हणून कारवाई झालेली नाही. त्यांनी कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत. त्यांच्यामुळे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि त्यातून आत्महत्या केली. आत्महत्या कोणामुळे केली हे लिहून ठेवलं आहे, सुशांत सिंह प्रकरणात अशी कुठलीही सुसाईड नोट नसूनही राज्य आणि केंद्रातील भाजपची भूमिका वेगळी होती आणि आता भाजप वेगळी भूमिका घेत आहे, हे देखील संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितलं.
आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल कलम ३०६ आणि हत्येला जबाबदार असल्याप्रकरणी कलम ३०७ अंतर्गत एखाद्या व्यक्तीला अटक झालेली असताना भाजपला त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ आंदोलन करायचं आहे. लोकशाहीतील अधिकारानुसार भाजपला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यामुळे कोणावरही अन्याय होता कामा नये, अशीच आमची भूमिका असल्याचंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना अलिबाग जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या नियमांचं उल्लघंन करून पोलिसांनी मला अटक केली असून मारहाणही केल्याचा आरोप करत अर्णबने मुंबई पोलीस दलातील ९ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. (shiv sena mp sanjay raut slams bjp over arnab goswami arrest in anvay naik suicide case)
हेही वाचा- अर्णबसह इतर दोन आरोपींना १४ दिवसांची पोलिस कस्टडी