Advertisement

युती तुटली ?


युती तुटली ?
SHARES

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेल्या युतीच्या चर्चेचे बार अखेर फुसकेच ठरले असून तिसरी बैठकही कोणत्याही निर्णयाविना संपली. मात्र, या बैठकीत शिवसेनेने भाजपासमोर केवळ 60 जागांचा प्रस्ताव ठेवला. भाजपाच्या 114 आणि शिवसेनेचा 60 जागांचा प्रस्ताव दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अमान्यच आहे. परंतु शिवसेनेने ठेवलेला 60 जागांचा प्रस्तावच युती तुटण्यास कारणीभूत आहे. एवढ्या कमी जागांमुळे भविष्यात युतीच्या चर्चेची बोलणी आता होणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती तुटलीच हे आता स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांच्या युती संदर्भातील बैठक शनिवारी रात्री वांद्रेच्या रंगशारदा सभागृहामध्ये पार पडली. युतीबाबत बैठक सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच संपली. या बैठकीत भाजपाने 114 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला दिला. तर शिवसेनाने 60 जागांचा प्रस्ताव भाजपाला दिला. शिवसेनेकडून अनिल परब, अनिल देसाई आणि रवींद्र मिर्लेकर तर भाजपाकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता आदी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमतांनी ठरवले की या आकड्यांनुसार या स्तरावर चर्चा करून काहीही फायदा नाही. कारण दोघांना एकमेकांचे प्रस्ताव अमान्य आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे प्रस्ताव आपल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना दिले जातील. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल आणि त्यानंतर पुढे चर्चा करायची की नाही हे ठरवले जाईल, अशी माहिती भाजपाच्या वतीने आशिष शेलार आणि शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

शिवसेना युती होण्याच्या बाजूने असल्यामुळे ते प्रथम 80 जागांचा प्रस्ताव देणार होते. परंतु, चर्चेच्या तिसऱ्या बैठकीत शिवसेनेने भाजपाला केवळ 60 जागांचा प्रस्ताव दिल्यामुळे आता युती करण्याची शिवसेनेची मानसिकताच नाही, हे उघड झाले आहे. त्यातच भाजपाने अव्वाच्या सव्वा जागांची मागणी करत ही मागणी मान्य होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्यावतीने एकला चलो चा नारा दिला जातोय. त्यामुळे आता जवळपास युती तुटल्यातच जमा असून आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अधिकृत शिक्कामोर्तब करणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा