Advertisement

दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती- शिवसेना

शरद पवार यांच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेतानाच शिवसेनेने काँग्रेसला चिमटा काढण्याची संधी देखील सोडलेली नाही.

दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती- शिवसेना
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहेत. शरद पवार यांच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेतानाच शिवसेनेने काँग्रेसला चिमटा काढण्याची संधी देखील सोडलेली नाही. 

८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छा शिवसेनेकडून (shiv sena) देण्यात आल्या आहेत. 

शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर भाष्य करताना अग्रलेखात काँग्रेसमधील अडथळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अग्रलेखात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्रातील काँगेस पक्षात खूप मोठे नेते मागच्या ७० वर्षांत निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता निर्माण झाला नाही. आजही लोक यशवंतरावांचेच स्मरण करतात. चव्हाणांनीच पवारांना घडवले. चव्हाणांनंतर त्यांच्याच तोलामोलाचा नेता म्हणून पवारांकडे पाहायला हवे. यशवंतरावांप्रमाणेच माणसे जमवण्याचा व सांभाळण्याचा छंद पवारांना आहे. त्या छंदास कोणी बेरजेचे राजकारण म्हणत असतील तर पवार अनेक वर्षे ही बेरीज करीत आहेत. राज्यातील ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज आहे. 

हेही वाचा- शरद पवार यूपीएचे अध्यक्ष? राष्ट्रवादीनेच केला खुलासा

काँग्रेस पुन्हा सोडणारे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून पुन्हा काँग्रेसच्याच बरोबरीने स्वतंत्र बाण्याचे राजकारण करणारे शरद पवार देशाने पाहिले. नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यागून शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यात पूर्ण तयारीनेच उतरले. राजीव गांधींच्या हत्येने गांधी परिवार राजकारणातून बाहेर पडलेला, काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन, दुर्बल झालेला, संसदीय काँग्रेस पक्षात तेव्हा मतदान झाले असते तर पवार नेतेपदी बहुमताने निवडून आले असते, पण वानप्रस्थाश्रमात निघालेल्या नरसिंह रावांना उत्तरेच्या लॉबीने पुढे केले व पवारांचा मार्ग अडवला. दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. 

पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली. संरक्षणमंत्री, कृषीमंत्री म्हणून केंद्रातली पवारांची कारकीर्द दमदारच होती. पवारांवर कायम संशय घेण्यात ज्यांनी धन्यता मानली ते पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे राजकारणातून नामशेष झाले.  

महाराष्ट्रात पवार विरोधकांना वेळोवेळी महत्त्वाची पदे वाटली गेली. पवार विरोधावर काँग्रेस (congress) पक्षातील तीन पिढ्या जगल्या हे कसले लक्षण मानायचे? शेतकरी, कष्टकरी दिल्लीस वेढा घालून पंधरा दिवसांपासून बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. लोकांना आकर्षित करील असे नेतृत्व आता उरलेले नाही. अशा वेळी महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला घोडा रोखून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची स्थापना करणारे, त्या सरकारचे नेतृत्व एका समझदारीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे शरद पवार देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करीत आहेत.

(shiv sena praises ncp chief sharad pawar on his 80th birthday through saamana editorial)

हेही वाचा- शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत विशेष काय?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा