कुठे नेवून बसवलं माजी महापौरांना ?

 BMC
कुठे नेवून बसवलं माजी महापौरांना ?
कुठे नेवून बसवलं माजी महापौरांना ?
See all

मुंबई - मुंबईचे महापौरपद भूषवलेल्या माजी महापौरांनाच शिवसेनेकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे. महापौरपद भूषवलेल्या ज्येष्ठ नगरसेवकांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांचा सन्मान करण्याऐवजी शिवसेनेने माजी महापौर विशाखा राऊत यांना स्थापत्य समिती (शहर) आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांना जी/उत्तर प्रभाग समिती आदी विशेष समित्यांची अध्यक्षपदे दिली. त्यामुळे शिवसेनेने माजी महापौरांना कुठे नेवून बसवले आहे? असा सवाल केला जात आहे. 

मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समिती(शहर), स्थापत्य समिती (उपनगरे), आरोग्य समिती, बाजार आणि उद्यान समिती, विधी समिती, महिला आणि बाल कल्याण समिती आदी विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. स्थापत्य समिती(शहर) अध्यक्षपदासाठी माजी महापौर विशाखा राऊत यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरले. तर उपाध्यक्षपदासाठी अमेय घोले यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला. स्थापत्य समिती(उपनगरे) अध्यक्षपदासाठी तुळशीराम शिंदे तर उपाध्यक्षपदासाठी विधी प्रमोद शिंदे आदींनी उमेदवारी अर्ज भरला.

आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी रोहिणी कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी समाधान सरवणकर, तर बाजार आणि उद्यान समिती अध्यक्षपदासाठी सान्वी विजय पाटील तर उपाध्यक्षपदासाठी गीता सिंघण, विधी समिती अध्यक्षपदासाठी अॅड. सुहास चंद्रकांत वाडकर, उपाध्यक्षपदासाठी चंद्रावती मोरे आणि महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्षपदासाठी सिंधु मसुरकर आणि उपाध्यक्षपदासाठी थेवर मरिअम्मा आदींनी सोमवारी उमेदवारी अर्ज महापालिका चिटणीस नारायण पठाडे यांच्याकडे सादर केले.

विशेष समिती अध्यक्षपदासाठी विशाखा राऊत वगळता सर्वच प्रथम निवडून आलेल्या नगरसेवकांना अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे. त्यामुळे आधीच संसदीय कामकाज पद्धतीची माहिती नसलेल्या नवीन नगरसेवकांना अध्यक्षपदी बसवून शिवसेनेने अनुभवी नगरसेवकांना मात्र अध्यक्षपदापासून दूर ठेवले आहे. माजी महापौर विशाखा राऊत यांच्यासह मिलिंद वैद्य यांच्यावर प्रभाग समिती यासारख्या विशेष समिती अध्यक्षपदाची जबाबदारी टाकून शिवसेनेने एकप्रकारे या माजी महापौरांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. हे दोन माजी महापौर शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे समर्थक मानले जातात. परंतु त्यांना विशेष समित्या देऊन शिवसेनेने एकप्रकारे अपमानित वागणूक दिली आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने दिलेल्या माहितीनुसार, माजी महापौरांना जर हा अपमान वाटत असेल तर त्यांनी ही पदेच स्वीकारू नयेत, तसेच त्यांनी नगरसेवक पदाची निवडणूकच लढवू नये, असे नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Loading Comments