'मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कारच'

  Mantralaya
  'मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कारच'
  मुंबई  -  

  शेतकरी संपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. हा तणाव थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत येऊन पोहोचला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून शिवसेना मंत्र्यांनी थेट बैठकीवरच बहिष्कार टाकल्याचे पहायला मिळाले. परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत बैठकीला गैरहजर राहिले.

  विशेष म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना सुभाष देसाई आणि दीपक सावंत दिवाकर रावतेंच्या दालनातच होते. तरी देखील त्यांनी या बैठकीला न जाणेच पसंत केले. दरम्यान, भाजपाकडून जरी बैठकीवर बहिष्कार नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'शिवसेनेचा बैठकीवर बहिष्कारच होता', असे सांगून वृत्ताला दुजोरा दिला.

  शिवसेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकलेला नाही. त्यांनी अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली, जी मुख्यमंत्र्यांनी दिली. जीएसटीबाबत जसे सगळ्यांना विश्वासात घेतले, तसेच आता कर्जमाफीसाठीही घेणार आहोत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे. उद्धव ठाकरे परदेशात आहेत, ते आल्यावर त्यांचे मतही विचारात घेणार आहोत. याशिवाय शेवटच्या शेतकऱ्याचेही मत विचारात घेऊ.

  सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

  शिवसेना मंत्री येऊन गेले असे नाही. मी सगळ्यात आधी आलो होतो. शिवसेनेचे मंत्री आले आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले की, उद्धवजी इथे नाहीत. त्यांच्याशी बोलून निर्णय घेऊ. त्यामुळे आज आम्ही उपस्थित राहणार नाहीत, असे सांगत त्यांनी बैठकीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली. त्यांनी बहिष्कार टाकला असे नाही, ते चुकीचे आहे.

  चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

  दरम्यान, शेतकरी संपासंदर्भातील सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली होती. पण वेळ न मिळाल्याने चर्चेशिवायच बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर पाच मिनिटांतच शिवसेनेचे मंत्री बैठकीतून बाहरे पडले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.