Advertisement

फक्त पालिकाच जबाबदार का? - उद्धव ठाकरे


फक्त पालिकाच जबाबदार का? - उद्धव ठाकरे
SHARES

मुंबईतल्या पावसानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडतोय की काय असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. 29 ऑगस्टच्या पूरस्थितीनंतर सर्वच वर्गांमधून आणि प्रामुख्याने सत्ताधारी मित्रपक्ष भाजपकडून शिवसेनेच्या सत्तेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेला जबाबदार धरले गेले. टीका केली गेली. मात्र यासाठी फक्त पालिकाच जबाबदार आहे का? मेट्रोची कामं आणि रेल्वे सेवेची काहीच जबाबदारी नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. शिवसेनेच्या आमदार-खासदारांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

'मुंबई आमची आहे, हे शहर आमचे घर आहे', ही भावना कायमच शिवसैनिकांमध्ये असते. त्यामुळे 'पूर येतच राहणार आणि माणसे मरत राहणार', असा विचार करण्याइतकी शिवसेना कोडगी नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी टीकाकारांना लगावला.


'शिवसेनेला मुंबईकरांची चिंता'

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र यामध्ये भाजपाने घटकपक्षांना निमंत्रितच केलेले नाही. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाल, 'सध्या सगळ्यांना केंद्रात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता लागली आहे. मात्र, शिवसेनेला मुंबईकरांच्या आरोग्याची चिंता आहे.'

दोन दिवसांपूर्वी भेंडीबाजारात कोसळलेल्या इमारतीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज्य सरकारच्या गृहनिर्माण धोरणावर टीका केली. 'एवढ्या इमारती धोकादायक आहेत आणि एवढ्यांना आम्ही नोटिसा दिल्या, हे सांगण्यापलीकडे सरकारच्या गृहनिर्माण धोरणाची मजल जात नाही. केवळ अमूक-तमूक ठिकाणी जागा खाली झाल्यानंतर गरिबांना घरे देऊ, असे सांगितले जाते' असे ते म्हणाले.


'आवास नव्हे, 'आ' वासून बघण्याची योजना'

'निवडणुकीच्या प्रचारातही ‘पंतप्रधान आवास योजने’सारख्या लोकप्रिय घोषणा करून गरिबांना मोफत घरे देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, सरकारने अशा लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा धोकादायक इमारतींमधील नागरिकांची पर्यायी व्यवस्था करून आहे ती परिस्थिती सुधारावी. 'पंतप्रधान आवास योजना' म्हणजे 'आ' वासून बघत बसायची योजना आहे' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.


'भ्रष्टाचार केला त्यांना फासावर लटकवा'

'मुंबईतील मिठागरांची स्थिती वाईट आहे. ती जर व्यापून टाकली तर पूर परिस्थिती निर्माण होईल. कचरा घोटाळा झाला असेल किंवा नाले सफाई घोटाळा झाला असेल, तसेच ज्यांनी भ्रष्ट्राचार केला असेल, त्यांना फासावर लटकवा' असे सांगत उद्धव यांनी भाजपाच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.


विनोद तावडेंनाही टोला!

'विना डिग्रीचे काही लोक आहेत, त्यांना काढून टाका. विना डिग्रीचे लोक मंत्री होतात, हे मी पार्कमध्ये वाचतो. विद्यापीठ निकाल लावणार आहेत की नाही?' असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.



हेही वाचा

उद्धव ठाकरे म्हणाले, 'महापालिकेच्या कामामुळेच मुंबई सुरक्षित'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा