Advertisement

म्हणून सातमकर, चेंबुरकरांना द्यावे लागले राजीनामे


म्हणून सातमकर, चेंबुरकरांना द्यावे लागले राजीनामे
SHARES

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबुरकर यांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे तातडीने राजीनामे मागून घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या रिक्त जागी माजी महापौर मिलिंद वैद्य आणि मनसेतून शिवसेनेत आलेले परमेश्वर कदम यांची वर्णी लावण्यात आली आहे.


बाहेरच्यांना आसन, ज्येष्ठांचं निष्कासन

शुक्रवारी या दोन्ही सदस्यांची नावे महापालिका सभागृहात महापौरांनी जाहीर केली. बाहेरुन आलेल्या नगरसेवकांच्या पुनर्वसनासाठी अशा प्रकारे ज्येष्ठ नगरसेवकांना राजीनामे देऊन अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे शिवसेनेतील असंतोष आता खदखदू लागला असून येणाऱ्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुकीत हा असंतोष उफाळून येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.


सातमकर, चेंबुरकरांना द्यायला लावले राजीनामे

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबुरकर यांना बुधवारी संध्याकाळी तातडीने राजीनामा पत्रावर स्वाक्षरी करण्याचे आदेश मातोश्रीवरुन जारी झाले होते. त्यानुसार दोन्ही नगरसेवकांनी यावर स्वाक्षरी केल्यानंतर राजीनाम्याचे पत्र तातडीने सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले होते. ते राजीनामे गुरुवारी संमत करण्यात आल्यानंर, शुक्रवारी या दोन्ही रिक्त जागेसाठी शिवसेनेचे गटनेते व सभागृहनेते यशवंत जाधव यांनी शिवसेनेच्या दोन सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव पाठवला. त्यानुसार पिठासीन अधिकारी असलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या दोन्ही जागांसाठी अनुक्रमे माजी महापौर मिलिंद वैद्य आणि मनसेतून शिवसेनेत आलेले परमेश्वर कदम यांची स्थायी समिती सदस्य म्हणून नावे जाहीर केली.


परमेश्वर कदमांविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरण

मिलिंद वैद्य हे सध्या सुधार समितीचे सदस्य असून जी उत्तर प्रभाग समितीचेही अध्यक्ष आहेत. तसेच परमेश्वर कदम हेही मनसेकडून सुधार समिती सदस्य असून ते आता शिवसेनेकडून स्थायी समितीचे सदस्य बनले आहेत. घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरमधील नगरसेवक असलेले परमेश्वर कदम यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु असून त्यामध्ये मागील पाच वर्षांत त्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रियाही सुरु आहे.


शिवसेनेला हवेत मान डोलावणारे सदस्य?

वैद्य आणि परमेश्वर कदम हे दोन्ही सभागृहात फारसे न बोलणारे असून स्थायी समितीच्या सदस्यपदी म्हणूनच त्यांची वर्णी लावली गेली आहे. शिवसेनेला या समितीत प्रस्तावांवर बोलणारे आणि त्यांची चिरफाड करणारे सदस्य नको असून केवळ प्रत्येक प्रस्तावावर मान डोलवत पाठिंबा देणारे सदस्य हवे आहेत. त्यामुळेच स्थायी समितीत अभ्यासपूर्ण बोलणाऱ्या मंगेश सातमकर आणि आशिष चेंबुरकर यांना तडकाफडकी राजीनामे देऊन या समितीवरून बाजूला करण्यात आल्याचं बोललं जात आहे.



हेही वाचा

सातमकर, चेंबूरकर देणार स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा