SHARE

मुंबई - महानगरपालिकेच्या ‘एम/पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार समृद्धी गणेश काते या बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिवसेना आणि भाजपा यांचे सात सदस्य आणि सपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य असे समसमान सदस्य संख्या असल्यामुळे ईश्वर चिठ्ठीचा पर्याय येण्याची दाट शक्यता होती. परंतु ऐनवेळी सपाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे काते यांची बिनविरोध निवड झाली आहे.

‘एम/पूर्व’ प्रभागात शिवसेनेचे 6, भाजपाचे 1, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1, समाजवादी पक्षाचे 5 आणि एमआयएमचे 1 असे एकूण 15 सदस्य आहेत. या निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून समृद्धी गणेश काते यांना तर समाजवादी पक्षाकडून अख्तर अब्दुलरज्जाक कुरेशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु निवडणुकीच्यावेळी अख्तर अब्दुलरज्जाक कुरेशी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी समृद्धी गणेश काते या बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. समृद्धी काते या आमदार तुकाराम काते यांच्या सुनबाई आहेत. तुकाराम काते आणि पत्नी मंगला काते यापूर्वी नगरसेवक होते. आता त्यांची सुनबाईही राजकारणात उतरली आहे.

मुंबईतील 17 प्रभागांपैकी 16 प्रभागांचा निकाल लागला होता. एकमेव एम-पूर्व प्रभाग समितीची निवड शनिवारी पार पडली. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने आठ, भाजपाने आठ आणि मनसेने एक अशाप्रकारे प्रभाग समिती मिळवल्या आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या