शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळणार डच्चू? पक्षातही मोठे फेरबदल

 Mumbai
शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळणार डच्चू? पक्षातही मोठे फेरबदल
Mumbai  -  

गुरुवारी संध्याकाळी शिवसेनेच्या काही नेत्यांच्या चेहऱ्यावर हासू आणि काहींच्या डोळयात आसू दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. विधिमंडळात शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांच्या जबाबदारीत बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. या पुनर्रचनेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेता आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे विधान परिषदेत पक्षाचे गटनेता म्हणून असलेली जबाबदारी काढून घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. रावते यांच्या जागी विधान परिषदेत शिवसेना गटनेतेपदावर अनिल परब यांची वर्णी लागू शकते. अनिल परब हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदार आणि सर्व मंत्र्यांना आपल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठकीसाठी पाचारण केलं आहे. या बैठकीत नव्या संघटनात्मक बदलांची घोषणा केली जाऊ शकते. शिवसेनेच्या अकार्यक्षम मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून आपलं चंबू गबाळं आवरावं, असे आदेशही उद्धव ठाकरे देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत आणि दीपक केसरकर आदींपैकी काहींना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त केलं जाऊ शकतं, तर काहींना कामगिरी सुधारण्याची समज दिली जाईल.बहुतांश मंत्री हे विधान परिषदेचे सदस्य आहेत, हा जनतेतून निवडून गेलेल्या म्हणजे विधानसभेच्या सदस्यांचा आक्षेपही शिवसेना पक्षप्रमुख विचारात घेणार आहेत.

तुलनेने नव्यांना महत्त्वाची जबाबदारी देताना ज्येष्ठांमध्ये डावललं गेल्याची भावना निर्माण होऊ नये, याचीही काळजी उद्धव यांना फेरबदल करताना घ्यावी लागणार आहे. काहींना पक्षाच्या ‘थिंक टँक’ मध्ये महत्त्वाचं स्थान, काहींना पक्षबांधणीत महत्त्वाची भूमिका आणि एका ज्येष्ठाची राज्यपाल पदासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडे शिफारस अशी काहीशी व्यूहरचना उद्धव ठाकरे यांनी करून ठेवली आहे. 

टप्प्याटप्प्यात आपली योजना उद्धव ठाकरे अमलात आणणार आहेत. दरम्यान, "उद्धव ठाकरे यांनी आज बोलावलेली बैठक ही केवळ माध्यमांनी सोडलेली पुडी आहे. उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्याचा निरोप कोणत्याही मंत्र्याला आलेला नाही." अशी नवी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 'मुंबई लाइव्ह' ला दिली आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळातल्या तीन मंत्री आणि काही आमदारांनी आज उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्याच्या बातमीला पुष्टी दिली आहे.

Loading Comments