Advertisement

यापुढं माझं नाव घ्याल तर… अंजली दमानियांचा खडसेंना इशारा

यापुढं कुठल्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांना दिला.

यापुढं माझं नाव घ्याल तर… अंजली दमानियांचा खडसेंना इशारा
SHARES

एकनाथ खडसे यांनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीही केला नाही. त्यांच्याविरोधातला विनयभंगाचा खटला संपलेला नाही. त्यामुळे यापुढं कुठल्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांना दिला. (social activist anjali damania warns eknath khadse over false allegations)

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, मी भाजपाचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधातही निवडणूक लढले आहे. पण एकनाथ खडसे यांनी माझा जेवढा छळ केला तेवढा कुणीही केला नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. नको ते शब्द माझ्याबाबत काढले. एकनाथ खडसे हे खुनशी प्रवत्तीचे आहेत. त्यामुळेच त्यांना धडा शिकवण्यासाठी मी त्यांच्याविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं. 

हेही वाचा - राजीनाम्यानंतर खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर प्रहार…

एकनाथ खडसे हे खोटं बोलत आहेत. या प्रकरणी अजून आरोपपत्रच दाखल झालेलं नाही तर खटला संपणार कसा? त्याला देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. एकनाथ खडसे जे काही माझ्याबद्दल बोलले ते जर अमृता फडणवीस यांच्याबद्दल बोलले असते तर फडणवीस शांत बसले असते का? असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

दरम्यान, माझ्यावर विनयभंगाचा खोटा खटला चालवण्यात आला. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ती महिला गोंधळ घालत असल्याने प्रसारमाध्यमांवर हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. त्यामुळे नाईलाजाने निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं. इतक्या खालच्या थराचं राजकारण झालं, यापेक्षा मरण परवडलं असतं. या सगळ्यातून मी सहीसलामत सुटलो नाहीतर बदनामी घेऊन जगावं लागलं असतं, अशी व्यथा एकनाथ खडसे यांनी मांडली होती.

हेही वाचा - एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत? तर सून भाजपमध्येच


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा