Advertisement

धर्मा पाटील यांचं पार्थिव धुळ्याकडे रवाना, लेखी आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात


धर्मा पाटील यांचं पार्थिव धुळ्याकडे रवाना, लेखी आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात
SHARES

जोपर्यंत जमिनीचा योग्य मोबदला तसेच धर्मा पाटील यांना शहीद भूमिपूत्र शेतकरी असा दर्जा मिळण्याबाबतचं लेखी आश्वासन सरकारकडून मिळत नाही, तोपर्यंत धर्मा पाटील यांचं पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली होती. या मागणीसाठी नरेंद्र पाटील यांनी जे. जे. रूग्णालयाच्या आवारात ठिय्या आंदोलनही केलं. त्यानंतर सर्वच स्तरातून सरकारवर तिखट शब्दात टीका झाल्यानंतर अखेर सरकारला नरेंद्र पाटील यांची मागणी मान्य करत लेखी आश्वासन द्यावं लागलं. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी दुपारी धर्मा पाटील यांचं पार्थिव ताब्यात घेतलं आणि ते धुळ्याच्या दिशेने रवाना झाले.

प्रकल्पग्रस्त धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांना जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यानं गेल्या कित्येक वर्षांपासून धर्मा पाटील योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत होते. पण त्यांच्या पदरी निराशाच पडत होती. ज्या मंत्रालयात त्यांना न्यायाची अपेक्षा होती त्याच मंत्रालयाच्या दारात विष प्राशन करत पाटील यांनी २२ जानेवारीला आत्महत्येचा प्रयत्न केला. ६ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २९ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला.

धर्मा पाटील सरकारी अनास्थेचा बळी आहे. ही आत्महत्या नव्हे, तर हत्या आहे असे आरोप धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांकडूनही केले जात आहेत. सोबतच योग्य मोबदल्याची मागणीही होत आहे. त्यानुसार ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी नरेंद्र पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधत जमिनीचं फेरमूल्यांकन करत ३० दिवसांत योग्य मोबदला देण्याचं आश्वासन दिलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नरेंद्र पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधत दोषींविरोधात कडक करावाई करण्याचं आश्वासन दिलं. बावनकुळे यांच्याकडून लेखी आश्वासनाचं पत्र मिळाल्याबरोबर दुपारी ४ वाजेच्या दरम्यान धर्मा पाटील यांचं पार्थिव ताब्यात घेत नरेंद्र पाटील आणि कुटुंबिय धुळ्याकडे रवाना झाले. पाटील यांच्यावर धुळ्यातील विखरण या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा