Advertisement

'मोबाईलचा सक्रिय वापर करा', राज्यपालांचं निवडणूक आयोगाला आवाहन


'मोबाईलचा सक्रिय वापर करा', राज्यपालांचं निवडणूक आयोगाला आवाहन
SHARES

लोकशाही बळकट करणासाठी लोकसहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेत युवकांना सामावून घेणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मोबाईलचा सक्रिय वापर करावा असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं आहे. तर लोकशाही सुदृढ करण्यासाठी राजकीय संस्कृती अधिक प्रगल्भ होणे आवश्यक आहे. निवडणुकांमधील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान सक्ती करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

सह्याद्री अतिथीगृह येथे लोकशाही, निवडणुका आणि सूप्रशासन या विषयावर एकदिवसीय परिषद घेण्यात आली, त्यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.


गावे स्वावलंबी व्हावीत - राज्यपाल

ग्रामीण भागात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. युवकांमध्ये त्याचं प्रमाण अधिक असून लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत युवकांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे, असं राज्यपालांनी यावेळी म्हटलं. त्यासाठी सोशल मीडिया हे योग्य माध्यम आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना, गणेश मंडळं यांच्या मदतीने मतदार नोंदणी आणि मतदान टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लोकसहभाग वाढवून लोकशाही प्रक्रिया बळकट करतानाच गावे स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कर्नाटक, केरळ राज्यांमध्ये यासाठी अधिक प्रभावीपणे काम सुरू आहे. महाराष्ट्रातही अशाच पद्धतीने उपक्रम राबवण्यासाठी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंना या दोन राज्यांमध्ये अभ्यासाठी पाठवावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.


मतदान सक्तीसाठी विचार करणे आवश्यक - मुख्यमंत्री

निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडणे आवश्यक आहे. त्यात निवडणुकांमध्ये पैशाचा अती वापर होतो, ही चिंतेची बाब असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. बऱ्याचदा निवडणुकीनंतर काही उमेदवारांकडून प्रती मतदान म्हणजेच 'मी इतके पैसे दिले', अशी भाषा कानावर पडते, त्यावेळेस चिंतेत अधिकच भर पडते. पैशाचा हा वापर थांबला पाहिजे. लोकशाहीबद्दल आपलेपणाची भावना वाढीस लागली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्याच्या कायद्यामध्ये ज्या निवडणुका घेतल्या जातात, त्यामध्ये मतदान सक्ती करता येईल का, याबाबत विचार करणे आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा