Advertisement

अर्णब गोस्वामीवर कारवाई करा, शिवसेना खासदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरुन सातत्याने शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणारे अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

अर्णब गोस्वामीवर कारवाई करा, शिवसेना खासदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी
SHARES

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरुन सातत्याने शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी सावंत यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. (take action against republic tv and arnab goswami demands shiv sena mp arvind sawant)

आपल्या निवेदनात अरविंद सावंत यांनी लिहिलं आहे की, बातम्या देण्याच्या व पत्रकारितेच्या नावाखाली उपरोक्त रिपब्लिक टीव्ही इंग्रजी आणि रिपब्लिक भारत हिंदी ही वाहिनी व तिचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे सतत बेजबाबदार बातम्या प्रसारीत करत आहेत. कुठल्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप लावण्यापर्यंत सदरची वाहिनी व तिचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची मजल गेली आहे. बातम्या प्रसारीत करताना यापूर्वीही त्यांनी राजकीय नेत्यांवर खासकरून विरोधी पक्षांतील नेत्यांवर अश्लाघ्य शब्दांत आरोप करून चारित्र्यहनन केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 

एका मृत महिलेबाबत आरोप करताना पत्रकारितेतील सर्व नितीमत्ता त्यांनी ओलांडली होती. त्या मृत महिलेची विटंबना आणि चारित्र्यहननाचे पातक त्यांच्याकडून घडले आहे. सदर महिलेच्या पालकांनी अशा अशोभनीय बातम्यांबद्दल आक्षेप घेतला होता. प्रेस काऊन्सिल आॅफ इंडियाने पत्रकारितेबाबत व बातम्या प्रसारीत करण्यासंदर्भात काही मर्याद उदघृत केलेल्या आहेत. परंतु सदरची वाहिनी व विशेषत: या वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी अत्यंत वाईट पद्धतीने या मर्यादांचं, आचारसंहितेचं उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे प्रेस काऊन्सिलने दिलेल्या कलम २५ व ३५ चं ही वाहिनी उल्लंघन करत आहे. काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गुन्ह्यासंदर्भात विभाजक आणि बेजबाबदार बातम्या खळबळजनकरित्या प्रसारीत करून सदर वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी समाजात तेढ निर्माण करून लोकांना चिथावणी देण्याचं काम करत आहेत. जेणेकरून राज्यात कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण होईल.

हेही वाचा - हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

एखाद्या गुन्ह्यासंदर्भात कुठलाही पुरावा नसताना बातम्या प्रसिद्ध करणे, त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकृत यंत्रणेच्या कामात व्यत्यय आणू शकतो. व खऱ्या गुन्हेगाराला सुरक्षित स्थळी पळण्यासाठी मदत होते. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा मान न राखता अत्यंत घृणास्पदरित्या बेछूट आरोप ही वाहिनी व अर्णब गोस्वामी करत आहेत. पोलीस खात्याचाही या वाहिनीने वारंवार अपमान केलेला आहे. आणि बातम्या प्रसारीत करताना पोलीस खात्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे.

एवढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत उल्लेख करून धमकावलं आहे. हे करतानाची त्यांची देहबोली अतिशय आक्षेपार्ह असून संतापजनही आहे. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. प्रेस काऊन्सिलने घालून दिलेल्या आचारसंहितेचा बेधडकपणे सदरची वाहिनी उल्लंघन करत आहे.

उभा महाराष्ट्र या वाहिनीवर व विशेषत: अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करण्याची वाट बघत आहे. आपण याबाबत स्वत: लक्ष घालून रिपब्लिक टीव्ही व या वाहिनीचा संपादक यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.    

हेही वाचा - मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा