Advertisement

शरजीलला पळून जाण्यात ठाकरे सरकारची मदत, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

हिंदुत्वावर वादग्रस्त वक्तव्य करणारा शरजील उस्मानी याला महाराष्ट्राबाहेर पळून जाण्यास ठाकरे सरकारने मदत केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

शरजीलला पळून जाण्यात ठाकरे सरकारची मदत, आशिष शेलारांचा गंभीर आरोप
SHARES

हिंदुत्वावर वादग्रस्त वक्तव्य करणारा शरजील उस्मानी याला महाराष्ट्राबाहेर पळून जाण्यास ठाकरे सरकारने मदत केल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. शिवाय शरजीलने केलेल्या अवमानकारक टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न देखील शेलार यांनी उपस्थित केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी आशिष शेलार यांनी शरजील आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या भेटीवरून शिवसेनेवर चांगलीच आगपाखड केली. ते म्हणाले, शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं म्हणजे यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. शरजीलला अटक करणार, पण कधी? आम्ही मागणी केल्यावर? पण त्याआधी एल्गार परिषदेला परवानगीच का दिली? त्यानंतर शरजीलने परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याला अटक करण्याचं सोडून मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर का जाऊ दिलं? त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्याचं काम सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडीने केलं आहे. हे त्यांचं पाप आहे, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला.

हेही वाचा- पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना करणार राज्यव्यापी आंदोलन

शरजीलला पळून जाण्यात मदत केल्यानंतर, भाजपने दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करु हे म्हणणं म्हणजे पश्चातबुद्धी आहे. हिंदूंना सडलेला म्हणणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचं काम शिवसेनेने का केलं हे स्पष्ट करावं, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

दिल्लीच्या सीमेवर शेती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नुकतीच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. काही आंतरराष्ट्रीय कलाकारांनीही शेतकरी आंदोलनाची दखल घेत, ट्विट करून त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यावर भाष्य करताना आशिष शेलार म्हणाले, शिवसेनेची अवस्था खाली डोकं आणि वर पाय अशी झाली आहे. 'महाराष्ट्रावर परराज्यातून कोणी टीका केली तर यांना महाराष्ट्रद्रोह आठवतो. पण परदेशातून कोणी आपल्या देशातील विषयावर टिप्पणी, बदनामी केली तर यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे परदेशातील कनेक्शन काय आहे हे संजय राऊत यांनी जनतेसमोर मांडावं. शिवसेनेने आमच्याकडे क्लास लावावा. नागपूरच्या कार्यालयात आपण वारंवार भेटला आहात, आताही जावं, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला. 

(thackeray government help sharjeel usmani to escape from maharashtra alleges bjp mla ashish shelar)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा