मंत्रिपदाची ‘मनोहर’ कथा


  • मंत्रिपदाची ‘मनोहर’ कथा
SHARE

मुंबई - देशाच्या संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आणि राजकीय तर्कवितर्कांना नव्यानं ऊत आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचा दावा स्वघोषित राजकीय विश्लेषकांनी करायला सुरुवात केली आहे. फडणवीस हे देशाचे नवे संरक्षणमंत्री होणार असल्याचं समाजमाध्यमांमधून सूत्रांच्या हवाल्यानं जाहीरही झालं आहे. याच सूत्रांनी देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर रावसाहेब दानवे, विनोद तावडे, संभाजी निलंगेकर पाटील किंवा चंद्रकांत पाटील यांच्यापैकी एकजण आरुढ होणार असल्याचीही मौलिक माहिती दिली आहे. राजकारणातले काही जाणकार केंद्रीय मंत्रिमंडळातला खांदेपालट काय असणार, हेही ठरवून मोकळे झाले आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणानुसार, देवेंद्र फडणवीस नवे संरक्षणमंत्री, विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली हे नवे गृहमंत्री, तर विद्यमान पेट्रोलियम मंत्री पियुष गोयल हे देशाचे नवे अर्थमंत्री असणार आहेत. आयत्या वेळी यात बदल होऊन कोळसा आणि खनिज मंत्रालयाची किल्ली देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन केली जाऊ शकते, असा अंदाजही नोंदवला गेला आहे. या बातमीला दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा आधार देण्यात आला. गंमत म्हणजे नवी दिल्लीत मोदी-शहा यांची भेट ज्या वेळी झाल्याचा दावा करण्यात आला, त्या वेळी नेमके अमित शहा गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित होते.

दुसरीकडे भाजपाच्या केंद्रातल्या एका ज्येष्ठ नेत्याने देवेंद्र फडणवीस यांना पुढची किमान तेरा वर्ष मुख्यमंत्रीपदावरुन हलवण्यात येणार नसल्याचा दावा केला आहे. या दाव्यात अतिशयोक्ती असली तरी त्यातला भावार्थ समजून घेण्यासारखा आहे. अडीच वर्षात कुशलतेने महाराष्ट्राच्या राज्यकारभाराचा गाडा हाकणाऱ्या, महत्त्वाच्या महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला ‘न भूतो’ यश मिळवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना इतक्यात दिल्लीत पाठवण्याचा भाजपाश्रेष्ठी आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार नाही, इतका साधासरळ अर्थ आहे. मात्र बातम्यांचे पतंग उंचच उंच उडायचे थांबलेले नाहीत. अर्थात या सर्वच गावगप्पा आहेत, अशातला भाग नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना केंद्रात आणण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु आहे. अन्य पर्यायांमधला एक पर्याय म्हणून देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावण्यावरही चर्चा झाली. राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागल्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाचा नेता मुख्यमंत्रीपदावर बसवावा, ही त्यामागची भूमिका होती. मात्र या सर्व चर्चा केवळ प्राथमिक स्तरावरच आहेत. जोर का झटका... देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नैपुण्य याआधीच चलनबंदी निर्णयाच्या निमित्तानं जगानं पाहिलं आहे. पंतप्रधानांच्या याच स्वभावामुळे पर्रिकर यांच्यानंतर प्रभावित होऊ शकणारे राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, देवेंद्र फडणवीस आदी नेतामंडळी राजकारणातल्या सर्जिकल अटॅकसाठी नव्यानं मनाने तयार झाले आहेत, हे मात्र खरं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या