Advertisement

केईएम रुग्णालय की राजकीय आखाडा? नेत्यांनी केली गर्दी


केईएम रुग्णालय की राजकीय आखाडा? नेत्यांनी केली गर्दी
SHARES

एल्फिन्स्टन रुग्णालयात एका बाजूला जखमी रुग्णांना तातडीने उपचारांची गरज असताना डाॅक्टरांच्या कामात व्यत्यय आणत काही राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसराचा चक्क राजकीय आखाडा केला. या नेत्यांच्या गोंधळाचा त्रास रुग्णांच्या नातेवाईकांना तर झालाच, पण रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यांनाही रुग्णालयात वेळेत पोहोचण्यास अडथळा झाला.

जिथे गर्दी दिसेल तिथे राजकीय पोळी भाजण्यासाठी तयार असलेल्या नेत्यांची असंवेदनशीलता केईएम रुग्णालयात ठळकपणे दिसून आली. रुग्णालयात उगाच गर्दी करू नये, डाॅक्टरांच्या कामात व्यत्यय आणू नये, याचे साधे भानही या नेत्यांनी बाळगले नाही. 

केईएमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यावर रक्ताची व्यवस्था करण्यासाठी बाहेर धावपळ करण्याचे सोडून राजकीय पक्षाचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठी गर्दी केली. यामुळे केईएममध्ये मृत आणि जखमींच्या नातेवाईकांपेक्षा त्यांचीच संख्या जास्त दिसून येत होती. येथे परिस्थिती इतकी गंभीर बनली की इतर रुग्णांना रुग्णालयात प्रवेश करणे किंवा बाहेर पडणेही अशक्य झाले.


उगाच नारेबाजी

काँग्रेस नेते राजू वाघमारे, राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: रुग्णालयाच्या आवारातच राजकारण करू नका… जखमींना रक्त द्या… रक्त द्या… अशी नारेबाजी करत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला.



मीडियाला धक्काबुक्की 

रुग्णालयातील जखमींची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत असे शिवसेनेचे नेते केईएम रुग्णालयात पोहोचले. या नेत्यांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचा घोळकाही असल्याने रुग्णालयात चांगलीच गर्दी झाली. ही नेतेमंडळी बाहेर पडू लागताच शिवसेना कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्कीही केली.


असे नेते येती...

याचसोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, खा. किरीट सोमय्या, काँग्रेस खा. अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम, काँग्रेस नेते भाई जगताप, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, भाजपा नेत्या शायना एन.सी. मनसेचे नेते नितिन सरदेसाई, राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी एका पाठोपाठ रुग्णालयाला भेट देत माध्यमांसमोर चमकोगिरी केली.




रेल्वे मंत्र्यांचा मागच्या दरवाजातून काढता पाय

एल्फिन्स्टन दुर्घटनेतील जखमींची विचारपूस करण्याकरीता केईएममध्ये पोहोचलेले रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना काही संतप्त नातेवाईकांचा सामना करावा लागला. त्यानंतर पुन्हा प्रसिद्धी माध्यमांशी गाठ पडू नये म्हणून त्यांनी जाताना मागच्या दरवाज्यातून काढता पाय घेतला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा