Advertisement

एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून संपवण्याचा डाव होता : संजय गायकवाड

मीडियाशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून संपवण्याचा डाव होता : संजय गायकवाड
SHARES

शिवसेनेत फूट पडून एक वर्ष उलटल्यानंतरही ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नक्षलवाद्यांकडून एन्काउंटर घडवून आणण्याचा डाव होता, असा आरोप त्यांनी केला आहे.

मीडियाशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच गायकवाड यांनी हा आरोप केला आहे. त्यांचा रोख महाविकास आघाडी सरकारकडं विशेषत: उद्धव ठाकरे यांच्याकडं असल्याचं बोललं जातं.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून त्यांना धमकी आली होती. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज होती. त्यानुसार झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, ‘मातोश्री’नं त्यास विरोध केला होता, असं गायकवाड म्हणाले. त्यांनी या संदर्भातील घटनाक्रमही सांगितला.

'एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भात गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी एकदा बैठक सुरू असताना मातोश्रीवरून फोन आला. शिंदेंची सुरक्षा वाढवू नका, असं सांगितलं गेलं. याचा अर्थ शिंदे यांना वाटेतून दूर करण्याचा प्लान होता. शिंदे राजकारणातून संपत नाहीत म्हणून त्यांना संपवण्याचा हा डाव होता. त्यामुळंच त्यांना सुरक्षा नाकारली गेली हे स्पष्ट आहे, असं गायकवाड म्हणाले.

शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार होता असा दावा ठाकरे गटाकडून वारंवार केला जातो. त्याचीही गायकवाड यांनी खिल्ली उडवली. ‘एकनाथ शिंदे यांना काहीही दिलं जाणार नव्हतं. त्यांचा बळी घेतला जाणार होता,’ असं गायकवाड म्हणाले.

संजय गायकवाड यांनी यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. ‘संजय राऊत ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, असं गायकवाड म्हणाले. 'पुण्यातील ड्रग्स रॅकेटप्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. त्यावरूनही गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करू नयेत. त्यातून काहीही हाती लागणार नाही. उलट त्यांच्याच अडचणी वाढतील. त्यांनी आधी ललित पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो पाहावेत, असा सल्ला गायकवाड यांनी दिला.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा