Advertisement

शिवसेना - भाजपाचं पुन्हा फाटलं!


शिवसेना - भाजपाचं पुन्हा फाटलं!
SHARES

भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी खेटून बसलेले असले तरी या दोघांमध्ये आलबेल नसल्याचं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. या दोन्ही पक्षांची स्थिती म्हणजे 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना' अशी झाली आहे. हे पुन्हा एकदा सांगण्याचं कारण म्हणजे राष्ट्रपतिपदावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा सुरू झालेली धुसफूस.
हो, नाही करता करता शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी कोविंद यांना पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेच्या मनात त्यांच्या उमेदवारीबद्दल अजूनही नाराजी दिसून येत आहे.

राज्यात मध्यावधी निवडणुका घेतल्याच, तर शिवसैनिक वणव्यासारखा पेटून उठेल. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवाच, तुमच्या छाताडावर भगवा फडकवू, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या 51 व्या वर्धापनदिनी भाजपाला दिलं होतं.

परंतु उद्धव यांनी भाजपाच्या छाताडावर बसण्याची भाषा केल्यानंतर शिवसेनेच्याच छाताडावर बसण्याचे डावपेच आखण्यास भाजपाने सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाने 2019 च्या निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस नव्हे, तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून, लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढवण्याचे आदेश खुद्द भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा नेत्यांना दिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 540 जागा निवडून आणण्याचे लक्ष भाजपाने ठेवले असून, सर्वांना 100 टक्के प्रयत्न करावाच लागणार असल्याच्या सूचनाही अमित शाह यांनी मुंबईच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी भाजपाच्या सर्व आमदार, खासदारांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहचण्याचा आदेशच शाह यांनी दिला आहे.

अशी वाढत गेली दोन्ही पक्षांतील दरी –

  • शिवसेना आणि भाजपामधील वादाची पहिली ठिणगी पडली ती 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी. ही ठिणगी इतकी मोठी होती की, या दोघांनी अनेक वर्षांचा संसार मोडत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
  • या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या भरघोस यशानंतर भाजपाची महाराष्ट्रातील ताकद वाढली. कधी काळी मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेला सत्तेमध्ये धाकट्या भावाची भूमिका बजावावी लागली. यामुळे दोघांच्या संबंधातील कटुता आणखी वाढली.
  • कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीमध्ये देखील हे दोन्ही पक्ष एकमेकांचे राजकीय शत्रू बनले. या निवडणुकीत तर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भाषणाची पातळी इतकी खालावली की वाघाच्या जबड्यात हात घालण्याची भाषा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच दुखावले.
  • नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही हे मित्रपक्ष पुन्हा एकदा शत्रू झाले. कधी नव्हे ते भाजपाने शिवसेनेला काँटे की टक्कर देत मुंबई महापालिकेत 82 नगरसेवक निवडून आणले. विशेष म्हणजे शिवसेनेवर लक्ष देण्यासाठी भाजपा आता मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बाजवत आहे.

आता तर खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानल्याने पुढे शिवसेना-भाजपाच्या नव्या वादाचा अंक पहावा लागणार हेही तितकंच खरं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा