Advertisement

बीडीडी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे दोन नेते आमनेसामने


बीडीडी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे दोन नेते आमनेसामने
SHARES

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत राज्य सरकार आग्रही आहे, तसेच या पुनर्विकासाबाबत काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरही तितकेच आग्रही आहेत. या पुनर्विकासाचे समर्थन आमदार कालिदास कोळंबकर यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर नायगावमध्ये मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स लावून कालिदास कोळंबकर यांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबद्दल जाहीर आभारही मानले आहेत.

मात्र दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते आणि अखिल बीडीडी चाळ रहिवासी महासंघाचे सरचिटणीस राजू वाघमारे यांनी कृती समितीच्या माध्यमातून बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा विरोध केला आहे. या पुनर्विकासाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे काँग्रेसचे दोन नेते एकमेकांच्या विरोधात असल्याचे चित्र सध्या नायगावमध्ये पहायला मिळत आहे.

बीडीडी चाळी पुनर्विकासाचे भूमिपूजन 21 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याच दिवशी आमदार कालिदास कोळंबकर यांनी नायगावमध्येही बीडीडी चाळी पुनर्विकासाचे वेगळे भूमिपूजन स्थानिक आमदार म्हणून केले. आमदार कालिदास कोळंबकर यांच्याशी 'मुंबई लाइव्ह'ने संपर्क साधला असता 'विरोधाला विरोध करायचा नाही. बीडीडी चाळीतील लोकांच्या मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुनर्विकास प्रकल्प होत आहे. अशा प्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे. 130-180 चौ. फूटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 400-500 चौ.फूटांचे घर मिळणार आहे. काही लोकांचा उद्देश दुसरा असल्याने या प्रकल्पाला विरोध करत आहेत. अशा लोकांच्या विरोधात काही दिवसात पुरावे सादर करुन अशा लोकांचा बुरखा फाडणार' असल्याची माहिती त्यांनी दिली.

तर काँग्रेसचे प्रवक्ते आणि अखिल बीडीडी चाळी रहिवाशी महासंघचे सरचिटणीस राजू वाघमारे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता आमदार कालिदास कोळंबकर यांनी रहिवाशांच्या हिताच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. रहिवाशांना अंधारात ठेऊन इतका मोठा प्रकल्प राबविला जात आहे. ट्रांझिट कॅम्प, कॉर्पस फंड, नवीन इमारतीच्या मेंटनेन्सचा खर्च कोण करणार? याबाबत राज्य सरकार आणि म्हाडाने रहिवाशांना अंधारात ठेवले आहे. उंच टॉवर्स झाल्यानंतर मेंटनेन्सचा खर्च सर्वसामान्यांना परवडणार नाही. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी या मुद्यांवर रहिवाशांना साथ देण्याऐवजी राज्य सरकारचे समर्थन करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स लावून काँग्रेसचे लोकप्रतिनिधी अभिनंदन करत असल्याचे सांगत त्यांनी कोळंबकर यांच्यावर जोरदार टीका केली.

आमदार कालिदास कोळंबकर नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. नारायण राणे यांच्यासाठी त्यांनी शिवसेना सोडली होती. आता राजकीय वर्तुळात नारायण राणे भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी भाजपा म्हणजेच राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेणे कालिदास कोळंबकर यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर,कालिदास कोळंबकर हेही भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यामध्ये उपयोगी ठरणारी भूमिका त्यांनी अगोदरच घेतल्याची कुजबूज नायगावमध्ये सध्या सुरू आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा