'...तर आधी मुंबईवर प्रेम करायला शिका'

 Dadar
'...तर आधी मुंबईवर प्रेम करायला शिका'

प्रभादेवी - मुंबई जिंकायची असेल, तर आधी मुंबईवर प्रेम करायला शिका असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. प्रभादेवी इथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुंबईची तुलना पाटण्याशी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईवर आरोप करण्याआधी नागपूरमधील खड्डे पडलेल्या रस्त्यांची दखल घ्यावी, मग विकासाच्या गोष्टी शिकवाव्यात अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

गेल्या पाच वर्षात शिवसेनेने जी कामे केली, त्यापैकी एक तरी काम केले नसल्याचा पुरावा भाजपाने दिल्यास त्यांनी सांगू ती शिक्षा भोगण्यास तयार असू, असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले.

नालेसफाई घोटाळा झाल्याचा दावा मुख्यमंत्री करतात, मग गंगा नदीची आरती करून ती साफ करण्यासाठी तीन हजार कोटींचा खर्च मोदींनी केला, तो गेला कुठे असा प्रश्नही त्यांनी या वेळी भाजपा सरकारला विचारला.

महापालिकेत भगवा फड्कल्यास मालमत्ता कर रद्द करणार, मोफत आरोग्य सेवा पुरवणार, शालेय विद्यार्थ्यांना बसने मोफत प्रवास देणार, महापालिका शाळांमधून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी निर्माण करणार, सफाई कामगारांना मोफत घरे देणार अशी आश्वासनेही उद्धव यांनी या वेळी दिली.

Loading Comments