SHARE

मुंबई - शिवसेनेचे सर्व आमदार आणि मंत्री येत्या 6 एप्रिलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी एकत्र येणार आहेत. पक्षाच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना स्नेहभोजनासाठी नाही तर त्यांची झाडाझडती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पाचारण केलं आहे. 

राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवणारे शिवसेनेचे मंत्री शिवसेनेच्याच आमदारांनी सांगितलेली लोकोपयोगी कामं करत नाहीत. अगदी एखाद दुसऱ्या मंत्र्यांचा अपवाद वगळता बाकीच्या मंत्र्यांमुळे पक्षाच्या आमदारांना आपल्या मतदारसंघातल्या जनतेची नाराजी ओढवून घ्यावी लागते, अशी तक्रार शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुखांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी शिवसेनेच्या आमदार-मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावणं महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. मंत्रिमंडळात शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणारे बहुतांश मंत्री हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. लोकांमधून निवडून आलेल्या म्हणजेच विधानसभेच्या आमदारांना मंत्रिपद न देता मागच्या दाराने आमदारकी मिळवणा-या नेत्यांना मंत्रिपद दिल्याबद्दलही पक्षाच्या विधानसभा सदस्यांमध्ये असलेली नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. या नाराजीचीही 6 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे दखल घेण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांचा खांदेपालट होण्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात रंगते आहे. निष्र्किय मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती करण्याची शिफारस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर हे घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तूर्त तरी उद्धव ठाकरे यांनी या विषयावर मौन बाळगलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या