
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार हे दिल्लीत दाखल झाले असून एकनाथ शिंदेंही रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीत दाखल झालेले ठाकरेंचे खासदार हे बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्याच चर्चेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
येत्या दोन दिवसात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच ठाकरे गटाचे सहा खासदार हे नॉट रिचेबल झाले असून ते दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात आता शिंदेंचे ऑपरेशन टायगर पूर्णत्वास जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिदे दिल्लीच्या दिशेने
एकीकडे ठाकरेंचे सहा खासदार दिल्लीत पोहोचले असून दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ठाकरेंचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत येण्यास तयार असून त्यांच्या सह्यांचे पत्रही तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या खासदारांसोबत दिल्लीत बैठक घेऊन त्यांचा वेगळा गट निर्माण केला जाऊ शकतो का याची चाचपणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
