'मुख्यमंत्री फक्त फीत कापण्यासाठीच येतात'

  Worli
  'मुख्यमंत्री फक्त फीत कापण्यासाठीच येतात'
  मुंबई  -  

  वरळी - पालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठिकठिकाणी सभा सुरू आहेत. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी वरळीत सभा घेतली. या सभेला आशिष चेंबूरकर, बाळा खोपडे, निरंजन नलावडे, स्नेहल आंबेकर, हेमांगी वरळीकर, आमदार सुनिल शिंदे, खासदार अरविंद सावंत, अभिनेता सुषांत शेलार, किशोरी पेडणेकर आणि वरळीतले शिवसैनिक उपस्थित होते.

  नाराज शिवसैनिकांना आवाहन

  उमेदवारी देताना नाराजी असते, पण शक्य असेल तितक्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. राग काढायचा असेल तर माझ्यावर काढा शिवसेनेवर काढू नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

  मुंबई बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही - उद्धव ठाकरे

  मुंबईची तुलना पाटणाशी केली आणि बिहार कोर्टाने गुजरात सरकारला टोला दिलाय. पाटणाशी तुलना करून परप्रांतीयांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी दुखावल्या. पोलिसांवर उपोषणाची वेळ भाजपा सरकारने आणली. मुख्यमंत्र्यांशी पोलीस सुरक्षेबाबत मी स्वतः चर्चा केली होती. मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासने दिली असा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. तुम्ही कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? मुंबई शहराची बदनामी करून त्याच शहरात राहायचे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

  ठाकरेंनी वाचला महापालिकेच्या कामांचा पाढा

  मुंबई महापालिका विकास कामांची फीत कापण्यासाठी मुख्यमंत्री नेहमी पुढे असायचे. 2700 च्या वर उद्याने महापालिकेने उभारली. मुंबई महापालिकेत एकही शाळा, हॉस्पिटल राज्य सरकारने बांधले नाही. महापालिकेने शाळा, हॉस्पिटल सुधारली. मुंबई 2005 सारखी पावसात तुंबणार नाही हे शिवसेनेचे वचन आहे. मुंबई महापालिकेचा नंबर एकचा रिपोर्ट आहे. मग केंद्रात की राज्यात यांची गाढवं बसलीयेत का हा रिपोर्ट खोटा द्यायला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

  मनात काळंबेरं नको म्हणून युती तोडली- उद्धव ठाकरे

  25 वर्ष आम्ही सोबत राहिलो. मनात काळंबेरं असणारी माणसं नकोत म्हणून युती तोडली. मुख्यमंत्री यांच्या प्रवृत्तीचा मला तिटकारा आलाय. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना मतं मागायला जात नाही. थापा मारून आम्ही मते मागितली नाहीत आणि मागणार नाही असंही ते म्हणाले.

  मेट्रो प्रकल्पावरुन भाजपला टोला

  मेट्रोचा उल्लेख भाजपा जाहीरनाम्यात करते. पण मेट्रोची कामे काँग्रेसने केली. रेल्वे ही इंग्रजांनी आणली. आम्ही केवळ भाडे वाढवतो असा टोला त्यांनी या वेळी लगावला. शिवराय हे आमचे दैवत आहे. शिवरायांचा फोटो निवडणूक प्रचारासाठी वापरणे हा अपमानच. दाऊद, कलानी यांचे फोटो लावा आणि प्रचार करा, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.