Advertisement

तर शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू, चंद्रकांत पाटलांचा आशावाद

भाजप शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार आहे. सत्तेत एकत्र आलो, तरी निवडणूक मात्र स्वबळावर लढू, असं वक्तव्य करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला चिमटा काढला.

तर शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू, चंद्रकांत पाटलांचा आशावाद
SHARES

राज्यातील विधानसभा निवडणुकीला आणखी ४ वर्षे शिल्लक आहेत. असं असलं तरी राज्यात कधीही निवडणुका होऊ शकतात. अशा वेळी जनतेच्या हितासाठी भाजप शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार आहे. सत्तेत एकत्र आलो, तरी निवडणूक मात्र स्वबळावर लढू, असं वक्तव्य करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला चिमटा काढला. (we are ready to form a government with shiv sena says bjp maharashtra president chandrakant patil)

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रदेश कार्यकारिणीत बोलताना राज्यातील महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेत स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करण्यास तयार असल्याचं सांगून पुन्हा एकदा पाण्यात खडा टाकून पाहिला. 

हेही वाचा - जो नेता घरातून बाहेरसुद्धा निघाला नाही, त्याला धारावीच्या यशाचं श्रेय का? - चंद्रकांत पाटील

सातत्याने सुरू असलेल्या कुरबुरी बघता महाविकास आघाडीतील पक्षांसोबत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जमेलच असं नाही. उद्धव ठाकरे यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी आजही चांगले संबंध आहेत. त्यातूनच जर पुढं काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली. तर ते थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलू शकतात. राज्याच्या हितासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काही फाॅर्म्युला तयार केला आणि उद्धव ठाकरे यांना हा फाॅर्म्युला मान्य झाल्यास आम्ही शिवसेनेसोबत जाऊ, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सत्तेत एकत्र आलो, तरी निवडणुका मात्र आम्ही एकत्र लढणार नाही. कारण कमी जागा येऊनही सत्तेत निम्मा वाटा मागायचा, हे सोयीचं राजकारण भाजपला जमणारं नाही. बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. पण तात्त्विक मतभेदामुळे नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रातही तसं होऊ शकतं, असा आशावाद चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दाखवला.

एका बाजूला भाजप शिवसेनेबाबत आक्रमक भूमिका घेत असताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकत्रित सत्ता स्थापनेचं वक्तव्य केल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यावर खुलासा करताना शिवसेनेकडून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. शिवाय भाजपने देखील शिवसेनेला असा कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही, असा खुलासा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा