Advertisement

राज्याच्या ‘कुबेरा’लाच सुट्ट्यांची चणचण


राज्याच्या ‘कुबेरा’लाच सुट्ट्यांची चणचण
SHARES

मुंबई - भविष्यातला ‘कॅशलेस’ महाराष्ट्र कसा असू शकतो याची चुणूक महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना अनुभवायला मिळाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या आदेशाचं पालन करताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागलीय. भाजपाच्या सर्व मंत्री, खासदार आणि आमदारांनी 8 नोव्हेंबर पासून आतापर्यंतचा बँक व्यवहारांचा तपशील पुरवावा असं फर्मान अमित शाह यांनी जारी केलंय. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश शिरसावंद्य मानत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन परिसरातली ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची शाखा गाठली. त्यांना आपल्या खात्यातून विशिष्ट रक्कम मिळाली खरी पण दोन हजार आणि शंभरच्या चलनात. मुनगंटीवार यांना हवं असलेलं 500 रुपयांचं चलन बँकेत उपलब्ध नसल्याची माहिती देत बँक अधिका-यांनी अर्थमंत्र्यांना ‘सरप्राइज’ दिलं ! त्यानंतर घडलेल्या घटनेनं मुनगंटीवार यांचा हा दिवस ‘आश्चर्यदिन’ ठरणार यावर शिक्कामोर्तब झालं. चर्चगेट परिसरातल्या एका प्रथितयश उपहारगृहात क्षुधाशांतीसाठी गेलेल्या अर्थमंत्र्यांना त्या उपहारगृहातल्या व्यवस्थापकानं नव्या अर्थकारणाची ओळख करून दिली. भोजनाचं बिल देण्यासाठी मुनगंटीवार यांनी दिलेली 2000 रुपयांची उपहारगृहात चक्क नाकारली गेली. नाईलाजानं सुधीर मुनगंटीवार यांना स्वतःजवळचं कार्ड स्वाइप करावं लागलं.

अमित शाह यांच्या लोकप्रतिनिधींसाठीच्या फर्मानाचं माध्यमांसमोर कोडकौतूक केल्यानंतर मुनगंटीवार यांना आलेला हा अनुभव. दरम्यान, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण आपल्या बँकखात्यांचा तपशील त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती मुनगंटीवारांनी दिलीय. शिवाय आपल्या अर्थव्यवहारातील पारदर्शकता ठसवून देण्यासाठी पुढच्या महिन्याच्या बँक व्यवहारांचे तपशीलही राष्ट्रीय पक्षाध्यक्षांपर्यंत देणार असल्याचं ते सांगायला विसरले नाहीत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा