• पक्षातील बातमी फोडणाऱ्यांविरोधात होणार कारवाई - बाळा नांदगावकर
SHARE

राज ठाकरे यांच्या घरी गुरुवारी झालेल्या चिंतन बैठकीतील विषय बाहेर गेलाच कसा, यावर मनसेच्या दादरच्या पक्ष कार्यालयात शनिवारी बैठक घेण्यात आली. मनसेच्या वतीने घेण्यात आलेली ही बैठक अर्धा तास सुरू राहिली. या बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पक्षाच्या गोपनिय बैठकीत झालेल्या गोष्टी बाहेर जातातचं कशा, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. जर पक्षातीलच कोणी या बातम्या बाहेर देत असेल, तर त्यावर कठोर कारवाई करणार असा ठराव शनिवारी झालेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. त्या व्यक्तीला तात्काळ पदावरून काढून टाकले जाईल, असंही या बैठकीत सांगण्यात आले.

गुरुवारी 'कृष्णकुंज'वर झालेल्या बैठकीत राज ठाकरे विरुद्ध नेते, सरचिटणीस खडाजंगी या बातमीचेही नांदगावकर यांनी खंडन केले. पक्षाचे नेते-सरचिटणीस यांच्यात फेरबदलाची मागणी प्रवक्ते संदीप देशपांडे आणि उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे सोशल मिडियाच्या माध्यमातून केली. त्यावर फेरबदलाचा अंतिम निर्णय राज ठाकरे यांचाच असल्याची पुष्टी नांदगावकर यांनी जोडली. राज ठाकरे लवकरच मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघात मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं ते म्हणाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या