मुंबई महापालिकेला राजकीय आखाड्याचे स्वरुप आले असून लोकप्रतिनिधीच्या सोबतीने प्रशासनातील अधिकारीही राजकारणात रस घेऊ लागले आहेत. यामुळे अनेकदा हुशार आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींच्या चांगल्या मागण्यांनाही अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जाते. केवळ एकमेकांचे पाय खेचण्याऐवजी राजकारणाचा उपयोग विकासासाठी व्हावा म्हणून महापालिकेने तरूणांना राजकारणात आणण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नन्स (आय.आय.पी.एल.जी) या संस्थेची स्थापना करावी, अशी मागणी मनसेने महापालिकेकडे केली आहे.
सक्षम व समाजकार्याची आवड असणाऱ्या तरुणांना राजकारणात योग्य संधी मिळवून देण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नन्स (आय.आय.पी.एल.जी) या संस्थेची स्थापना करण्याची मागणी मनसेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. या मागणीत त्यांनी तरुणांमध्ये राजकारणाबाबत लक्षणीय जागरुकता निर्माण झाली असून मुंबईसह राज्यातील तरुणांकरीता राजकीय व्यासपीठाची स्थापना करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात यश मिळवत आहेत. सामाजिक तसेच राजकीय दृष्टीकोनातून बदलत असलेले त्यांचे विचार खूपच प्रशंसनीय असल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे निदर्शनास येते. तरुण वर्गाची धडाडी, साहस, जिद्द वाखाण्याजोगी आहे. तरुण वर्ग सध्या राजकीय क्षेत्रामध्ये धडाडीने काम करत आहे. तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विविध महत्वाच्या पदावर कार्यरत असून तरुण वर्गाचा राजकारणाकडे कल वाढू लागला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या तरुणांना राजकारणात उचित संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण ही मागणी केल्याचे नरवणकर यांनी म्हटले आहे.