आदित्य ठाकरे घेणार नगरसेवकांची शाळा


SHARE

मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा ही केवळ शिवसेना नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोमवारऐवजी शनिवारी घेण्यात येईल. शनिवारी होणाऱ्या महापालिका सभेपूर्वी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची एक बैठक बोलावली असून या बैठकीत आदित्य ठाकरे हे महापालिकेच्या विविध विषयांसंदर्भात शाळा घेणार असल्याचं समजतं.


आदित्य ठाकरे घेणार आढावा

मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी २३ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली होती. या सभेपूर्वी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे सर्व नगरसेवकांशी संवाद साधणार होते. परंतु, आदित्य ठाकरे, नाणार प्रकल्पाच्या ग्रामस्थांना भेटण्यास सोमवारी जात असल्याने महापौरांनी सभेची तारीख बदलून ती शनिवारी २१ एप्रिल अशी केली आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची सभा बोलावली असून यामध्ये आदित्य ठाकरे हे सर्व नगरसेवकांकडून विविध विषयांसंदर्भात आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा विविध विषयांसंदर्भात अभ्यास समिती बनवली आहे. प्रत्येक वरिष्ठ नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा, शिक्षण, पाणी पुरवठा, आरोग्य यासह विविध विषयांसंदर्भात समिती गठीत करण्यात आली आहे.


नगरसेवकांची करणार कानउघाडणी

ही समिती गठीत केल्यानंतरही नगरसेवकांकडून याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे याच विषयांसंदर्भात आदित्य ठाकरे यांच्याकडून कान उघाडणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभागृहनेते आणि स्थायी समिती अध्यक्षांसह सर्व समिती अध्यक्षांची निवड झाली आहे. त्यामुळे यासर्व अध्यक्षांना शुभेच्छा देतानाच आपल्या सर्व नगरसेवकांचे कान उपटण्याचंही काम आदित्य ठाकरे करणार असल्याचं समजतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या