Advertisement

स्टुडंट काऊन्सिलवर युवासेनेचा झेंडा


स्टुडंट काऊन्सिलवर युवासेनेचा झेंडा
SHARES

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी संघटनांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत (स्टुडंट काऊन्सिल)वर सोमवारी अखेर युवासेनेचा झेंडा फडकला. या निवडणुकांमध्ये दोन जागा शिवसेनेच्या गटातून निवडून आल्याने युवासेनेनं जल्लोष साजरा केला. निवडणूक जिकंल्यानंतर दोन्ही विजयी उमेदवारांनी इतर सदस्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीकेची झोडही उठवली.


शिक्षणमंत्र्यांवर निशाणा

मंत्र्यांची बैठक घेऊन ही निवडणूक घेणार नाही, असं सांगितलं होतं, तरी अभाविपने निवडणूक अर्ज भरला. अवघा एक तास असताना या फसवणुकीविरोधात आम्ही अर्ज भरले आणि निवडून आलो. हा विजय आम्ही साजरा करतोय असं म्हणत आदित्य यांनी शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला.

तर, या निवडणुकीत काही जणांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची टीका युवा सेनेच्या इतर सदस्यांनी करत अप्रत्यक्षरित्या भाजप आमदारांवर निशाणा साधला.


युवासेनेचं बळ वाढणार

स्टुडंट काऊन्सिलच्या अध्यक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत युवासेना पुरस्कृत सानिया नाघुठणे हिने अभाविपच्या सूरज यादव याचा पराभव केला. तर सचिव पदी ग्रॅविल गोन्सालवीस हिची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदांमुळे युवासेनेच्या सिनेटचे संख्याबळ वाढणार आहे. या विजयानंतर युवा सेना आणि अभाविप या दोन्ही संघटनांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे.


'शिवसेनेचा घोडेबाजार'

सोमवारी झालेल्या निवडणुकीत युवा सेनेने घोडेबाजार केल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. अभाविपने अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना संपर्क करून मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र युवासेनेनं या निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा उपयोग करत मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि विजयश्री खेचून नेल्याची टीका अभाविपने प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. तर पुढील शैक्षणिक सत्रात कॉलेज निवडणूक सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर सेनेकडून पैसा आणि राजकीय हस्तक्षेप होणे लाजीरवाणी गोष्ट असल्याचं मत कोंकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा