'गृहनिर्माण नियामक कायदा सौम्य करु नका'

 Pali Hill
'गृहनिर्माण नियामक कायदा सौम्य करु नका'

मुंबई - गृहनिर्माण नियामक प्राधिकरण अर्थात रियल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी अॅक्ट (रेरा) सौम्य करण्याचा वा कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न राज्यांनी करू नये असा इशारा केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सर्व राज्यांना दिला आहे. नायडू यांच्या या इशाऱ्याचं मुंबई ग्राहक पंचायतीने स्वागत केलं आहे. गुजरातसह महाराष्ट्राकडून कायद्यात बदल करत कायदा सौम्य करण्याच्या हालचाली सुरु आहे.

नव्या प्रकल्पांना कायद्यात अंतर्भूत न करण्यासह बिल्डरांना अनेक पळवाटा ठेवण्याचाही प्रयत्न झाला आहे. कायदा सौम्य केल्याने कायद्याचे मूळ उद्दिष्ट दूर रहात होते. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीने यावर जोरदार आक्षेप घेत यासंबंधी केंद्र सरकारकडे दाद मागत कायदा सौम्य करु नये अशी मागणी केली होती.

या मागणीनुसार मंगळवारी सर्व राज्याच्या गृहनिर्माण सचिवांची एक बैठक दिल्लीत घेण्यात आली. या बैठकीत नायडू यांनी सर्व राज्यांच्या गृहनिर्माण सचिवांना कायद्यात बदल वा कायदा सौम्य न करण्याचा कडक इशारा दिला आहे. त्यामुळे आता केंद्राच्या मूळ कायद्यानुसारच राज्याचा कायदा होईल आणि हा कायदा ग्राहकांना दिलासा देत बिल्डरांच्या मनमानीपणाला चाप बसवण्या महत्त्वाची भूमिका बजावेल, असं म्हणत पंचायतीचे अध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी नायडू यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Loading Comments