SHARE

मुंबई - मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून परवडणारी घरे सर्वसामान्यांना उपलब्ध होतात. आता यापुढे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड (एसपीपीएल) कडूनही सोडतीद्वारे सर्वसामान्यांना मोक्याच्या ठिकाणी घरे उपलब्ध होणार आहेत. रखडलेल्या झोपु योजनांना अर्थसहाय्य देत त्या मोबदल्यात 300 चौ. फुटांची घरे विक्री घटकातून बिल्डरांकडून घेण्याच्या योजनेद्वारे शिवशाहीला 106 घरे उपलब्ध होणार आहेत. वाकोल्यातील दत्तमंदिर आणि ओशिवऱ्यातील संतोषनगर अशा मोक्याच्या ठिकाणी ही घरे असून 2018 मध्ये या घरांसाठी सोडत निघण्याची शक्यता असल्याची माहिती शिवशाहीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. ओशिवऱ्यातील घराच्या किंमती 58 लाखांच्या घरांत तर वाकोल्यातील घर 50 लाखांच्या घरात असणार असल्याचीही माहिती या अधिकाऱ्यानं दिलीय. या घरांच्या खरेदीसाठी शिवशाही या दोन्ही प्रकल्पातील बिल्डरांना 58 कोटी रुपये देणार आहे. विशेष म्हणजे ही सोडत झाल्यास तब्बल 12 वर्षांनंतर शिवशाहीकडून घरं विकली जाणार आहेत.

योजना वादात अडकणार

परवडणाऱ्या घरांची योजनेखाली ही योजना शिवशाहीने आणली. पण ही घरे 50 ते 60 लाखांत विकली जाणार असल्यानं घरे परवडणारी कशी असा सवाल आता केला जात असल्यानं ही योजना प्रत्यक्षात येण्याआधीच वादात अडकण्याची शक्यता आहे. शिवशाहीनं मात्र ही घरे परवडणारीच असल्याचा दावा केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या