Advertisement

सेन्सेक्स ८४० अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे ४.५७ लाख कोटी सपाट


सेन्सेक्स ८४० अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे ४.५७ लाख कोटी सपाट
SHARES

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेअर बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर लाॅन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वसूल करण्याची घोषणा करताच घसरणीला लागलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स अजूनही सावलेला नाही. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स तब्बल ८४० अंकांनी गडगडून ३५,०६७ वर आपटला. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५६ अंकांनी घसरून १०,७६१ वर बंद झाला. परिणामी गुंतवणूकदारांचे तब्बल ४.५७ लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

शेवटच्या तासाभरात शेअर्सची चौफेर विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स ९०० अंकांपर्यंत घसरला होता. तर निफ्टी देखील २८१ अंकांपर्यंत खाली आला होता. आयटी कंपन्यांचे शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.


का झाली घसरण?

शेअर बाजारातून मिळणाऱ्या १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या उत्पन्नावर १० टक्के लाॅन्गटर्म कॅपिटल गेन टॅक्स लावण्याची घोषणा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी केली होती. असं करताना किमान सद्यस्थितीत लावण्यात येणारा सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स हटवण्यात येईल, अशी अपेक्षा होती. पण तसंही झालं नाही. यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता कमालिची बिघडल्याने त्यांनी चौफेर शेअर्सविक्री केली.


किती नुकसान?

या चौफेर विक्रीमुळे एका दिवसांत गुंतवणूकदारांचे ४,५७,६१५.३८ कोटी रुपये बुडाले आहेत. १ फेब्रुवारी रोजी बीएससीवरील नोंदणीकृत कंपन्यांची मार्केट कॅप १,५३,१३,०३३.३८ कोटी रुपये होती. ती घटून १,४८,५५,४१८ कोटी रुपयांवर आली आहे.


कुठे, किती घसरण?

शुक्रवारी बहुतेक सर्वच क्षेत्रातील इंडेक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. त्यातही सर्वाधिक ६ टक्क्यांची घसरण रियाल्टी इंडेक्समध्ये नोंदवण्यात आली. त्यापाठोपाठ आॅटो इंडेक्समध्ये ३.३० टक्के, मेटल इंडेक्समध्ये २.८९ टक्के, पीएसयू बँकेत २.५९ टक्के, फार्मा इंडेक्समध्ये १.१६ टक्के, एफएमसीजीत ०.८० टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा