सलग ४ दिवस उच्चांक नोंदवणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या तेजीला मंगळवारी अखेर ब्रेक लागला. यामुळे दिवसअखेर सेन्सेक्स ५३ अंकांनी घसरून ३३,२१३ अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८ अंकांनी घसरून १०,३३५ वर बंद झाला.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका (पीएसयू) आणि मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याने प्रामुख्याने शेअर बाजार घसरला. खासकरून सलग ४ दिवस वाढ नोंदवतानाच शेअर बाजाराने विक्रमी उच्चांकही गाठला होता. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सचा मोठा वाटा राहीला. मात्र मंगळवारी गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी याच शेअर्सची विक्री केल्याने शेअर बाजारात घसरण झाली.
यामुळे निफ्टीच्या ‘पीएसयू’ बँक इंडेक्समध्ये सर्वाधिक २.१४ टक्के घसरण झाली. तर निफ्टी मेटल इंडेक्समध्ये १.७१ टक्के निफ्टी आटो ०.४९ टक्के, निफ्टी आयटी इंडेक्समध्ये ०.१५ टक्के घसरण झाली. निफ्टीच्या ५० नोंदणीकृत कंपन्यांपैकी ३२ कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर १७ कंपन्यांचे वधारले. तर एफएमसीजी, फार्मा आणि रियाल्टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली.