Advertisement

... म्हणून नाना शंकरसेठ ओळखले जातात मुंबईचे आद्य रचनाकार

पश्चिम रेल्वे मार्गावरील 'मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका'चं (Mumbai Central Station) नामांतर करण्यास ठाकरे सरकारनं (Thackeray Government) मंजुरी दिली आहे. जाणून ध्या नाना शंकरशेठ यांच्याबद्दल...

... म्हणून नाना शंकरसेठ ओळखले जातात मुंबईचे आद्य रचनाकार
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील 'मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका'चं (Mumbai Central Station) नामांतर करण्यास ठाकरे सरकारनं (Thackeray Government) मंजुरी दिली आहे. या स्थानकाला मुंबईचे आद्य शिल्पकार 'नाना शंकरशेठ' (Nana Shankar Sheth) यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ (Nana Shankar Sheth Terminus) स्टेशन असं नामकरण करण्यात येणार आहे.

पण नाना शंकरशेठ कोण होते? त्यांचं नाव देण्याचं काय कारण? असं त्यांनी काय केलं आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात डोकावले असतीलच. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दलच माहिती देणार आहोत


रेल्वेचे संचालक

नाना शंकरशेठ हे भारतातील पहिल्या रेल्वे कंपनी ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’चे पहिले संचालक होते. त्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे पितामह’ असंही म्हटलं जातं. हेच कारण आहे की मुंबई सेंट्रलला त्यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे


व्यापारी घरात जन्म

जगन्नाथ शंकरशेट यांचा जन्म मुंबईत दैवज्ञ ब्राह्मण कुटुंबात झाला. १० फेब्रुवारी १८०३ रोजी नाना शंकर शेठ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईत आले होते. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर आणि एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. नानांचे वडील १८२२ मध्ये वारले. तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची आणि व्यापाराची सर्व जबाबदारी पडली.

पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला आणि अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळवली. अनेक अरब, अफगाण तसंच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत


सामाजिक सुधारणेची पायाभरणी

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभाच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारासाठी व्हावी, या हेतूनं त्यांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.


  • १८१९ मध्ये माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन संपूर्ण मुंबई इलाख्याचा गव्हर्नर झाला. दरबार आणि मेजवान्यांच्या निमित्तानं त्याची आणि नानांची गाठ पडली. एल्फिन्स्टननं मुंबई इलाख्यात आधुनिक शिक्षणाचे पर्व सुरू करण्याचा ठाम निर्धार केला होता
  • नानांची बुद्धिमत्ता आणि प्रगल्भता यामुळे एल्फिन्स्टननं त्याच्या प्रयत्नांमध्ये नानांना महत्त्वाचं स्थान दिलं. त्यांच्या प्रयत्नांनंतर १८२२ मध्ये ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळी’ची स्थापना झाली आणि नानांच्या सार्वजनिक कार्याचा प्रारंभ झाला.
  • मातृभाषेतून शिक्षण दिले जावे याबद्दल एल्फिन्स्टनप्रमाणेच नानाही आग्रही होते. त्यांच्यामुळे मराठी, गुजराती, हिंदी भाषांमध्ये आणि देवनागरीत प्रथमच क्रमिक पाठय़पुस्तके छापली गेली. परिणामी, आधुनिक शिक्षणाची दारे सर्वाना खुली झाली
  • १८२७ मध्ये एल्फिन्स्टन इंग्लंडला परत जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याच्या सत्कारासाठी जो निधी गोळा केला गेला, त्यातून एल्फिन्स्टन कॉलेज आणि शिक्षण संस्था कार्य करू लागल्या. याच एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे यासारख्या बुद्धिमंतांची पहिली पिढी तयार झाली.
  • घरातील वातावरण धार्मिक असूनही सतीबंदीचा कायदाच नव्हे तर त्याची अंमलबजावणीही कडक असावी, असं ठाम मत नानांनी १८२८ मध्ये निर्भीडपणे मांडलं. मुंबई इलाख्यात असा कायदा केल्यास फारशी विरोधी प्रतिक्रिया उमटणार नाही. उमटलीच तर लोकांना समजावून सांगता येईल असा नानांचा दृढ आत्मविश्वास होता
  • १८४५ मध्ये जे. जे. रुग्णालय आणि ग्रँट मेडिकल महाविद्यालयाची स्थापना, १८४९ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय व संस्थांद्वारे एतद्देशीयांच्या कन्याशाळा, १८५१ मध्ये सर्वाना संस्कृतचे शिक्षण खुले करणारे ‘पूना संस्कृत कॉलेज’(आजचे डेक्कन कॉलेज), १८५५ मध्ये पहिले विधि महाविद्यालय, १८५७ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीची स्थापना असा नानांच्या कर्तृत्वाचा आलेख चढतच गेला.
  • बाँबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल.
  • मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या जमिनी सरकारला दिल्या.

  • नानांनी मुलींच्या कन्याशाळेसाठी डॉ. विल्सन यांना स्वतःचा वाडा दिला.

  • ताडदेवमध्ये आपल्या वडिलांच्या नावे धर्मार्थ दवाखाना सुरू केला. त्याचा सर्व खर्च नाना करीत. हा धर्मार्थ दवाखाना कायम चालू राहावा यासाठी त्यांनी २४०००/- रुपये सरकार जमा केले. कालांतराने यामध्ये अजून ६०००/- रुपयांची भर घालण्यात आली. कालांतराने ही रक्कम ट्र्स्ट डीड द्वारे नायर हॉस्पिटलला देऊन तेथे एक कायमची खाट ठेवण्यात आली.

  • नानांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.



हेही वाचा

तरूणानं साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची मोजेक पोर्टेट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा