सह्याद्री वाहिनीचा चित्ररत्न पुरस्कार डॉ. मोहन आगाशेंना प्रदान


सह्याद्री वाहिनीचा चित्ररत्न पुरस्कार डॉ. मोहन आगाशेंना प्रदान
SHARES

16 वा सह्याद्री नवरत्न पुरस्काराचा दिमाखदार सोहळा गुरुवारी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये संपन्न झाला. यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अनेक वर्षांपासून अधिराज्य गाजवणारे मराठमोळे अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना सह्याद्री वाहिनीचा यंदाचा चित्ररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, पत्रकारितेतील विशेष कामगिरी करणाऱ्या पत्रकारांसाठी दिला जाणारा यंदाचा रत्नदर्पण पुरस्कार अॅग्रोवन वृत्तपत्राचे संपादक आदिनाथ चव्हाण यांना देण्यात आला.

'आतापर्यंत कोणत्याही नाटक कला आणि अभिनयाचे शिक्षण कोणत्याही विद्यापीठात घेतले नाही. आपल्यासाठी प्रेक्षकच खूप मोठे विद्यापीठ आहेत. ते समोरून जी दाद देतात त्यातून आपण शिकत गेलो' असे, मत मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

'आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले परंतु, आजच्या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व आहे. त्याचे कारण सिक्कीमचे राज्यपाल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे पुत्र असलेल्या श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य लाभले. आपल्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाची सह्याद्री वाहिनीने दखल घेतली. त्यामुळे हा पुरस्कार आपल्यासाठी आनंदाचा धक्का देणारा आहे', असे मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी गायिका आरती टिकेकर यांना स्वररत्न पुरस्कार, अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना नाट्यरत्न पुरस्कार, रामदास भटकळ यांना साहित्य रत्न पुरस्कार, डॉ. एम. एम. भानुशाली यांना सेवारत्न पुरस्कार, प्रा. रमेश पानसे यांना शिक्षण रत्न पुरस्कार, समाजात शिक्षणाचे बीज रोवल्यामुळे बेबीताई गायकवाड यांना रत्नशारदा पुरस्कार, चित्रकार सुहास बहुलकर यांना कलारत्न पुरस्कार तर, गायिका आर्या आंबेकर हिला यंदाचा गोदरेज फेस ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संबंधित विषय