Advertisement

रिअॅलिटी शोमुळे तुमच्या मुलांचं नुकसान होतंय का? हे वाचा!

आजच्या रिअॅलिटी शो आणि टीआरपी गेममुळे लहान मुलांवर नक्की कसा परिणाम होतो? हे जाणून घेण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'च्या प्रतिनिधींनी केईएमच्या मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रशिक्षिका डॉ. शुभांगी पारकर आणि सायन हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. मोना गजरे यांच्याकडे विचारणा केली. या चर्चेतून निघालेले धक्कादायक निष्कर्ष प्रत्येक पालकांना रिअॅलिटी शोचा गांभीर्याने विचार करायला लावणारे आहेत. काय म्हणाले मानसोपचार तज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ?

रिअॅलिटी शोमुळे तुमच्या मुलांचं नुकसान होतंय का? हे वाचा!
SHARES

सध्या रिअॅलिटी शोचा जमाना आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, बंगाली...तुम्ही म्हणाल त्या भाषेमध्ये भारंभार रिअॅलिटी शो आहेत. आणि या रिअॅलिटी शोंमध्ये अगदी ५ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंत स्पर्धक असतात. एकीकडे या रिअॅलिटी शोमुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची, काहीतरी मिळवण्याची आणि त्यातून करिअर घडवण्याची संधी उपलब्ध होते. पण यातून त्या लहानग्यांवर होणाऱ्या विपरीत परिणामांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं.

१९९५ साली झी चॅनेलवरच्या बुगी वुगीपासून या 'रिअॅलिटी शो' प्रकाराला सुरुवात झाली. त्यानंतर सह्याद्रीवर आलेल्या 'दम दमा दम'नेही अनेक लहानग्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी दिली. मात्र, सुरुवातीच्या काळात या रिअॅलिटी शोंचं 'संधी देण्याचं' असलेलं स्वरूप कालांतराने निव्वळ व्यावसायिक झालं. आणि त्यातूनच मिळणाऱ्या टीआरपीसाठी वाट्टेल ते केलं जाऊ लागलं.



रिअॅलिटी शोच्या या बाजारीकरणामुळे सर्वात जास्त परिणाम होतो तो यातल्या लहान स्पर्धकांवर. मानसोपचार तज्ज्ञ आणि फिजिओ एक्स्पर्ट्सचा दावा आहे की रिअॅलिटी शोंमध्ये सध्या सुरु असलेल्या प्रकारांमुळे लहान मुलांवर शारिरीक आणि मानसिक परिणाम होतो. अशा कार्यक्रमांमधून रातोरात मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे पालकही अनेकदा आपल्या मुलांसाठी काय योग्य काय अयोग्य याचा सारासार विचार न करताच मुलांना अशा कार्यक्रमांमध्ये पाठवतात. पण नकळत आपण मुलांचं नुकसान करतोय ही गोष्ट त्यांच्या ध्यानातही येत नाही. कार्यक्रमाचा आणि त्यातून चॅनेल्सचा टीआरपी वाढवण्यासाठी मुलांकडून त्यांच्या वयाला आणि मनाला न झेपणारी मेहनत आणि परफॉर्मन्सेस करून घेतले जातात.



आजच्या रिअॅलिटी शो आणि टीआरपी गेममुळे लहान मुलांवर नक्की कसा परिणाम होतो? हे जाणून घेण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'च्या प्रतिनिधींनी केईएमच्या मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रशिक्षिका डॉ. शुभांगी पारकर आणि सायन हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. मोना गजरे यांच्याकडे विचारणा केली. या चर्चेतून निघालेले धक्कादायक निष्कर्ष प्रत्येक पालकांना रिअॅलिटी शोचा गांभीर्याने विचार करायला लावणारे आहेत. काय म्हणाले मानसोपचार तज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ?


मुलं हरवतात बालपण

ज्या वयात आपल्या लहानग्यांनी त्यांच्या बालविश्वाची मजा घ्यायची, त्या वयात त्यांना प्रचंड मानसिक ताणाच्या स्पर्धेमध्ये धावावं लागलं. यामुळे लहान वयातच ही मुलं मोठ्या माणसांसारखी जड वागू लागतात. नैसर्गिक वेळेच्या खूप आधी प्रगल्भ होतात.



लैंगिक आकर्षण

आज अनेक रिअॅलिटी शोंमध्ये मुलांना खूपच बोल्ड गाणी गावी लागतात किंवा त्यावर नृत्य करावं लागतं. ही गाणी या मुलांच्या विचारशक्तीला समजण्यापलीकडची असतात. त्यामुळे ज्या गोष्टी मुलांना एका विशिष्ट वयात कळायला हव्या, त्या त्यांना वयाच्या आधीच समजू लागतात. ही मुलं वेळेआधीच बोल्ड होतात. शिवाय, परफॉर्मन्ससाठी देण्यात आलेले कपडे हा ही सर्वात महत्त्वाचा विषय आहे. त्यांना दिल्या जाणाऱ्या आकर्षित कपड्यांमुळेही त्यांच्याच बोल्डनेस येतो. अनेकदा या मुलांमध्ये लैंगिक मर्यादांचीही जाणीव राहात नाही. ज्या वातावरणात ही मुलं वावरतात त्याचाही प्रभाव त्यांच्या दैनंदिन वागण्यावर होण्याची शक्यता आहे.


आक्रमकता वाढते

रिअॅलिटी शो सुरु असताना स्पर्धक मुलांसाठी सर्व गोष्टी हव्या त्या पद्धतीने घडतात. पालकांकडूनही मुलांचं कोडकौतुक केलं जातं. त्यामुळे या मुलांच्या वागणुकीमध्ये आक्रमकता येते. शिवाय मनासारखं न झाल्यास ती चिडचिडी होतात. मुलांवर नियंत्रण न राहिल्यामुळे नंतर अशा मुलांना आवर घालणं कठीण होऊन बसतं.



पालक करतात तुलना

माझा मुलगा रिअ‍ॅलिटी शोमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडपर्यंत तरी पोहोचावा, असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. म्हणून मग मुलांना गाण्याच्या, नाचण्याच्या किंवा अन्य कोणत्या ना कोणत्या क्लासला पाठवलं जातं. हे मुलांच्या आवडीने असेल, तर ठीक. मात्र, ते सक्तीने असेल तर त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यातूनच मग पुढे तुलनाही सुरू होते. मुलांच्या मनात त्या वयात भावनिक गुंता तयार होऊ शकतो.


शारिरीक त्रास

रिअॅलिटी शो, त्यांचं शुटिंग, त्यांची वेळापत्रकं या सगळ्यामध्ये मुलांची खूप ओढाताण होते. निव्वळ प्रसिद्धीसाठी केला जाणारा हा खेळ थेट मुलांच्या आरोग्याशी होत आहे, याची जाणीवही पालकांपर्यंत पोहोचत नाही.

रिअॅलिटी शो मुळे लहान मुलांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. खूप काळ सतत प्रॅक्टिस केल्यामुळे झोप कमी लागते. थकवा मोठ्या प्रमाणात येतो. खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात. त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण वाढतं. त्यांचं वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे मुलांनी आणि त्यांच्या आई-वडिलांनी काळजी घ्यायलाच पाहिजे.

डॉ. मोना गजरे, बालरोगतज्ञ , सायन रुग्णालय


आज आम्ही अनेक शो घरी बघतो. आमची मुलंही ते कार्यक्रम बघतात. पण अनेकवेळा असे कार्यक्रम मुलांना दाखवू नयेत आणि मुलींनीही ते बघू नयेत, असं मला वाटतं. कार्यक्रमासाठी निवडली जाणारी गाणी, अंगविक्षेप, वेषभूषा ही अतिशय बोल्ड पद्धतीने केलेली असते. माझी मुलगी ही पूर्वी डान्स करत असे. मात्र जोगवा, कोळीगीतं, शेतकरी अशी पारंपारिक गाण्यांची निवड तिच्यासाठी कायम केली. पण आताचे डान्स म्हणजे केवळ कसरती असतात. म्हणजे गाणं कोणतंही असलं, तरी कवायत केली जाते. त्यामुळे मुलांना रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायला लावणं नको वाटतं.

कांचन मोरे, पालक


माझी मुलगी छान डान्स करते. ती भरतनाट्यम शिकली आहे. तिने रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हावं, अशी माझी इच्छा आहे. जसाजसा काळ बदलतोय तसं काळाबरोबर पुढं जाणं गरजेचं आहे. लोकांना जे बघायला आवडतं, ते दाखवणं गैर नाही. हो, कधी-कधी काही गाणी लहान मुलांनी करु नयेत, असं वाटतं. माझी मुलगी जेव्हा अशा स्पर्धांमध्ये भाग घेईल, तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी काळजी मी घेईन.

साक्षी कांगणे, आई

मुलांच्या कलागुणांना वाव देणं हे प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य असतं. नव्हे, त्यांनी ते केलंच पाहिजे. मुलांना प्रोत्साहनही दिलं पाहिजे. पण असं करताना त्यांच्या बालपणाशी, त्यांच्या आरोग्याशी आणि कदाचित ज्यासाठी हा सर्व अट्टहास आहे, त्या त्यांच्या भविष्याशीच आपण खेळ तर करत नाही ना? याची जाणीव पालकांना असायलाच हवी. शेवटी, धावण्याच्या गर्दीत कुठे थांबायचं, हेही कळायला हवं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा