Advertisement

रेल्वेमध्ये छेडछाड काढणाऱ्या टपोरींचा कर्दनकाळ!

छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुंबईतल्या एका तरूणानं पुढाकार घ्यायचं ठरवलं. यासाठी तो चक्क गॉगल घालून फिरणारा 'स्पाय' झाला. या तरूणामुळेच महिलांची छेडछाड करणारे टपोरी तुरुंगाची हवा खात आहेत.

SHARES

रेल्वे प्रवासात मुलींची छेड काढणं, चुकीचा स्पर्श करणं किंवा त्यांना जाणूनबुजून धक्का मारणं अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी मुंबईतल्या एका तरूणानं पुढाकार घ्यायचं ठरवलं. यासाठी तो चक्क गॉगल घालून फिरणारा 'स्पाय' झाला. या तरूणामुळेच महिलांची छेडछाड करणारे टपोरी तुरुंगाची हवा खात आहेत.


वॉर अगेंस्ट रेल्वे रावडिज

दिपेश टँक आणि त्याच्या नऊ मित्रांनी २०१३ साली 'वॉर अगेंस्ट रेल्वे रावडिज' एक मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत दिपेश टँकनं रेल्वेमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या, स्टंट करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. जवळपास १५० आरोपींना पकडून देण्यात दिपेश आणि त्याच्या टिमनं मदत केली आहे.


रेल्वेत फिरणारा 'स्पाय'

छेड काढणाऱ्यांना आणि स्टंट करणाऱ्यांना पकडून देण्यासाठी दिपेशनं त्याच्या टिमसोबत एक संकल्पना राबवली. रेल्वेमध्ये किंवा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर दिपेश स्पाय गॉगल घालून वावरायचा. या स्पाय गॉगलच्या मदतीनं दिपकनं छेडछाडीच्या घटना किंवा स्टंट करणाऱ्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीनंच त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.


पोलिसांची साथ

एखाद्या रेल्वेच्या डब्यात किंवा प्लॅटफॉर्मवर अशा घटना होत असतील तर त्याची माहिती देखील वेळोवेळी दिपेशनं पोलिसांना कळवली आहे. पोलिसांनी देखील घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई केली आहे. दिपेशच्या मदतीनं पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये छेड काढणारे, स्टंटबाजी करणाऱ्यांचा समावेश आहे.   


म्हणून झाला 'स्पाय'

निर्भया घटनेनं मी पूर्णपणे हादरून गेलो. ही घटना माझ्या मनात घर करून गेली आहे. या घटनेनंतरच मला वॉर अगेंस्ट रेल्वे रावडिज ही मोहीम छेडायला भाग पाडलं. आज अनेक मुली छेडछाड, रेपसारख्या घटनांना बळी पडत आहेत. निर्भया प्रकरणानंतरही अनेक रेपच्या घटना समोर आल्या आणि अजूनही येत आहेत. मी मानतो की रेप तर पुढची स्टेप आहे. पण छेडछाडीसारख्या घटनांमधून पहिली सुरुवात होते. जर अशा नराधमांना त्यावेळीच नाही रोखलं तर पुढे जाऊन ते रेपही करू शकतात

- दिपेश टँक 


असा आहे स्पाय गॉगल

सुरुवातीला दिपेश आणि त्याची टीम अशा घटना कॅमेऱ्यात कैद करायची. पण अनेकदा ते पकडले गेले आणि त्यांच्यावरच हल्ला झाला. यावर उपाय शोधता शोधता दिपेशला स्पाय गॉगलबद्दल कळालं. गॉगलमध्ये एचडी कॅमेरा असल्यानं त्याच्या कामासाठी हे योग्य गॅजेट होतं. पण भारतात ते उपलब्ध नव्हतं. शेवटी अमेरिकेतल्या त्याच्या मित्राच्या मदतीनं त्यानं हे गॅजेट मागवलं. यासाठी त्यानं स्वत:च्या खिशातून २५ हजार रुपये खर्च केले.


मोहीम जीवावर बेतली

दिपेशला या मोहिमेमुळे अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागला आहे. त्याला मारण्याच्या धमक्या तर आल्याच. शिवाय दोन - तीन वेळा त्याच्यावर हल्लाही करण्यात आला. पण दिपेश मानतो की चांगल्या कामाला नेहमीच विरोध होतो. कितीही समस्या आल्या तरी मी माझं कर्तव्य पार पाडणार, हे सांगायला दिपेश विसरला नाही.


गर्दीतले बघे होऊ नका

दिपेश तर त्याचं कर्तव्य पार पाडतोय. पण तुमचं काय? स्वत:च्या घरातल्या स्त्रीसोबत एखादी घटना घडली तरच तुम्ही बोलणार का? प्रत्येक स्त्री ही कोणाची ना कोणाची आई असते, बहिण असते. बायको असते. अशा घटनांवर त्याच क्षणी स्त्रीनं आक्रमक पवित्रा घेतलाच पाहिजे यात काही शंका नाही. पण यासोबत तिच्या आसपासच्या लोकांनी देखील अशांचा विरोध केला पाहिजे. कदाचित एकाच्या विरोधानं असे नराधम घाबरणार नाहीत. पण जास्त संख्येनं लोकांनी विरोध केला तर छेढ काढणाऱ्यांची किंवा रेप करणाऱ्यांची काही करण्याची हिंमतच नाही होणार. त्यामुळे नुसते गर्दीतले बघे होऊ नका. विरोध करा...   





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा