मुंबईकर आणि महाराष्ट्रातील रहिवाशांना कर्करोगाच्या तपासणीसाठी आता वारंवार हॉस्पिटलला येण्याची आवश्यक्ता नाही. कारण मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅनची संकल्पना एशियन कॅन्सर फाऊंडेशननं (ACF), नर्गिस दत्त फाउंडेशनच्या सहकार्यानं राबवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नर्गिस दत्त फाउंडेशननं या व्हॅन्स भेट म्हणून दिल्या आहेत. या व्हॅनला प्रिया दत्त यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
नर्गिस दत्त फाउंडेशनचे विश्वस्त, एसीआयचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. रमाकांत देशपांडे, एसीएफचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. दीपक पारीख, एसीएफचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय शर्मा, एसीएफचे संचालक डॉ. जगदीश यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कर्करोग हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. दिवसेंदिवस या आजाराचं प्रमाण वाढत आहे. या हेतूनेच ACF कडे आता एक विशेष मोबाइल स्क्रीनिंग वाहन आहे. यामुळे क्रन्सरचं निदान लवकर होण्यासाठी मदत मिळेल.
एशियन कॅन्सर फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. दीपक पारीख म्हणाले, “नवीन मोबाईल व्हॅन मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन कॅन्सर रुग्णांची माहिती ठेवेल. हे स्क्रीनिंग प्रोग्रामला मदत करेल आणि कर्करोगाच्या सर्वात प्रचलित प्रकारांची नोंद ठेवेल. ज्यामुळे त्यामागील कारणांचे विश्लेषण करण्यात मदत होईल. तपासणीसाठीच्या शिबिरांसह, आम्ही जागरूकता कार्यक्रम आणि समुपदेशन यावरही अधिक भर देऊ. दरवर्षी किमान ५००० लोकांची स्क्रीनिंग करण्याचं लक्ष्य आहे.”
पारीख पुढे म्हणाले, “तोंडाचा कर्करोग तपासणी आणि तोंडाची बायोप्सी प्रक्रियेसाठी व्हॅनमध्ये दंत खुर्चीचा समावेश आहे. या व्हॅनमध्ये स्तन आणि ग्रीवाच्या तपासणीसाठी पॅप स्मीअर चाचण्यांसाठी एक तपासणी बेड आहे.
प्रिया दत्त यांनी नमूद केलं की, "एशियन कॅन्सर फाऊंडेशनसोबत यापेक्षा चांगली भागीदारी होऊ शकली नसती. यात सर्व नामांकित डॉक्टर आहेत. आरोग्य खूप महत्वाचे आहे. आम्ही निधी उभारण्यास सुरुवात केली आहे. भारतातही आणि रूग्णांना त्यांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी निधी देण्यास सुरुवात केली आहे. कर्करोग लवकर आढळल्यास बरा होऊ शकतो. निधीच्या कमतरतेमुळे कोणत्याही व्यक्तीला आपला जीव गमवावा लागू नये."
हेही वाचा