Advertisement

प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांचं हस्तलिखित भंगारात सापडलं

'में पल दो पल का शायर हूँ' या गाण्याचे गीतकार साहिर लुधियानवीही काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या गीताची मोहिनी आजही संगीत रसिकांच्या मनावर कायम आहे. पण असं असलं तरी त्यांचे ह्सतलिखित दस्तावेज मात्र भंगारात सापडल्याचं उघडकीस आलं आहे.

प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांचं हस्तलिखित भंगारात सापडलं
SHARES

में पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, अभी ना जाओ छोड कर के दिल अभी भरा नही, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, अशी अजरामर गाणी लिहिणारे साहिर लुधियानवी. आजही त्यांची गाणी अनेकांच्या ओठी आहेत. प्रख्यात ऊर्दू कवी, शायर आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या अशाच अर्थपूर्ण गीतांनी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: अधिराज्य केलं. तो काळ सरला. साहिर लुधियानवीही काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या गीताची मोहिनी आजही संगीत रसिकांच्या मनावर कायम आहे. पण असं असलं तरी त्यांचे खाजगी दस्तावेज मात्र भंगारात सापडल्याचं उघडकीस आलं आहे. 


दस्तावेज जतन करणार

साहिर लुधियानवी यांची मौल्यवान हस्तलिखित पत्रे, कविता, डायरी आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो हे जुहू इथल्या एका भंगारवाल्याच्या दुकानात सापडल्या आहेत. मुंबईतील ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’ या ना नफा- ना तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थेला जुहूच्या एका भंगार दुकानात वर्तमानपत्रं आणि मासिकांच्या ढिगाऱ्यात साहिरची शब्दरत्नं सापडली. त्याचे जतन करण्याच्या दृष्टीकोनातून या संस्थेनं फक्त तीन हजार देऊन पत्रे, कविता, डायरी आणि फोटो हे दस्तावेज खरेदी केले आहेत. लवकरच त्यांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.


काय आहे संग्रहात?

दस्तावेजमध्ये साहिर यांच्या रोजच्या दिनक्रमातील बाबी आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचे तपशील आहेत. याशिवाय साहिर यांच्याच हस्ताक्षरातील अनेक कविता आणि महत्त्वाच्या नोंदीही त्यात आहेत. साहिर यांनी संगीतकार रवी आणि अशाच अनेक प्रख्यात कवींना लिहिलेली पत्र देखील त्या संग्रहात आहे. यातली काही पत्रे इंग्रजीत तर काही ऊर्दूमध्ये आहेत. बाकी सर्व साहित्य ऊर्दूत आहेत. तर पंजाबमधल्या त्यांच्या घराचे फोटो देखील रद्दीत सापडले आहेत. 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement