Advertisement

डोंबिवलीचे 'सह्याजीराव' ९००० सह्यांचे धनी!

६२ वर्षीय सतीश चाफेकर यांचा छंद ऐकून तुम्ही देखील अवाक् व्हाल! सतीश चाफेकर यांनी नावाजलेल्या व्यक्तीमत्वांच्या स्वाक्षरीचा संग्रह केला आहे. जवळपास ९ हजारांहून अधिक सह्यांचा संग्रह त्यांच्याकडे पाहायला मिळतो. सह्यांचा संग्रह करणं हा त्यांचा फक्त छंद नाही तर पॅशन आहे आणि याच पॅशनमुळे त्यांना जगण्याचा नवा अर्थ कळाला.

डोंबिवलीचे 'सह्याजीराव' ९००० सह्यांचे धनी!
SHARES

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कुणी टपाल तिकिटं जमवतं, कुणी जुन्या नाण्यांचा संग्रह करतं, कुणाला कविता लिहिण्याचा तर एखाद्याला गड-किल्ले सर करण्याचा छंद असतो. असाच एका अवलिया डोंबिवलीत रहातो.



६२ वर्षीय सतीश चाफेकर यांचा छंद ऐकून तुम्ही देखील अवाक् व्हाल! सतीश चाफेकर यांनी नावाजलेल्या व्यक्तीमत्वांच्या स्वाक्षरीचा संग्रह केला आहे. जवळपास ९ हजारांहून अधिक सह्यांचा संग्रह त्यांच्याकडे पाहायला मिळतो. सह्यांचा संग्रह करणं हा त्यांचा फक्त छंद नाही तर पॅशन आहे आणि याच पॅशनमुळे त्यांना जगण्याचा नवा अर्थ कळाला.


'सह्याजीराव' नावानं प्रसिद्ध!

स्वाक्षरी ही प्रत्येक माणसाची ओळख असते असं म्हणतात. स्वाक्षरीमधून माणसाचं व्यक्तीमत्व उलगडतं. डोंबिवलीकर सतीश चाफेकर यांना अशाच अनेक व्यक्तीमत्वांची ओळख या सह्यांच्या माध्यमातून झाली आहे. क्रिकेटर, कलाकार आणि साहित्यिक या क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या सह्यांची जमवाजमव चाफेकरांनी केली आहे.



निव्वळ क्रिडापटूंच्याच ३००० सह्या!

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपिलदेव, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरपासून ते भावी क्रिकेटर पृथ्वी शॉपर्यंत सर्वांच्या सह्या त्यांच्या संग्रहात आहेत. एवढंच नाही, तर परदेशी क्रिकेटर शेन वॉन, ब्रेट ली, शेन वॉटसन, इयॅन चॅपल अशा अनेक क्रिकेटर्सच्या सह्या त्यांनी घेतल्या आहेत. फक्त क्रिकेटरच नाही तर टेनिस, बॅडमिंटन, एव्हरेस्ट गिर्यारोहक अशा जवळपास ३००० पेक्षा अधिक खेळ जगतातील दिग्गजांच्या सह्या त्यांच्याकडे आहेत.




नील आर्मस्ट्राँगचीही सही!

फक्त खेळ विश्वातीलच दिग्गज नाहीत, तर सिनेसृष्टीतील कलाकार, साहित्यिक आणि शास्त्रज्ज्ञ या क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत. जॅकी चेन, बियॉन बोर्ग, बाळासाहेब ठाकरे, ऐश्वर्या रॉय, प्रियांका चोप्रा ते पेन ड्राइव्हचा जनक, इंटरनेटचा जनक, एमपी-थ्रीचा जनक, नील आर्मस्ट्राँग अशा जवळपास ९००० हून अधिक नावाजलेल्या व्यक्तींच्या सह्या आहेत.

शाळेत असल्यापासून म्हणजेच ११ वर्षांचा असल्यापासूनच मी स्वाक्षऱ्या घ्यायचा छंद जोपासला. ११ वर्षांचा असताना आमच्या चाळीत एम. चिरीअप्पा आले होते. तेव्हा मी ठाण्यात रहायचो. पहिली सही मी त्यांची घेतली होती. शाळेमागे तेव्हा खुला रंगमंच होता. तिकडे निळू फुले, श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर हे कलाकार यायचे. मी या कलाकारांना पाहिलं असं सांगितल्यावर कुणाचा विश्वास नाही बसायचा. मग तेव्हापासून मी सह्या घ्यायला लागलो.

सतीश चाफेकर, सही संग्राहक



धोपटण्यावर घेतली सचिनची सही!

बॅट्स, बॉल, टीशर्ट, टोपी, डायरी, खेळाडूंचे पोस्टर अशा वस्तूंवर त्यांनी सह्या घेतल्या आहेत. त्यांच्याकडे १०० हून अधिक बॅट्स असतील. हसत हसत चाफेकर म्हणतात, "माझं घर एखाद्या म्युझियमपेक्षा कमी नाही. एकदा तर सचिनची सही मी कपडे धुण्याच्या धोपटण्यावर घेतली होती. तो सुद्धा हसला होता! पृथ्वी शॉची पहिली सही घेण्याचा मान मला मिळाला."



...असं सुरू झालं सह्यांचं म्युझियम

सतीश चाफेकर यांनी २००० साली त्यांच्या घरासमोरील फ्लॅट विकत घेतला. तिथे काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार वसंत गोवारीकर यांनी पहिल्यांदा घरी भेट देऊन स्वाक्षरी केली. तेव्हापासून आजतागायत हा प्रवास सुरू आहे. हे निवासस्थान म्हणजे स्वाक्षऱ्यांचे संग्रहालय आहे! 'हे माझे घर शब्दांचे' अशा ओळी प्रवेशद्वाराशी रेखाटलेल्या आहे. 



आशा खाडिलकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, शरद पोंक्षे, द्वारकानाथ संझगिरी, शिवशाहीर दादासाहेब पुरंदरे, सुधीर गाडगीळ, कवी ग्रेस, प्रकाश आमटे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या भिंतींवर स्वाक्षरी केली आहे. एवढंच काय, सचिन तेंडुलकरच्या आई रजनी तेंडुलकर यांनी देखील स्वाक्षरी केली आहे.



लिम्का बुकलाही घ्यावी लागली नोंद

घरातील भिंतींवरील सह्यांच्या सर्वात मोठ्या संग्रहासाठी चाफेकर यांची लिम्का बुकने नोंद घेतली आहे. पुढच्या पिढीला या थोर लोकांच्या सह्या पाहता याव्यात, या विचारानं स्वाक्षरीचे जतन ते करत आहेत. त्यांच्यासाठी हा मोठा खजिना आहे. 'छंद माणसाला आधार देतो आणि समृद्ध करतो', असं ते समाधानाने सांगतात.



हेही वाचा

गंभीर आजारालाही तिनं हसून दिलं उत्तर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा