Advertisement

Valentine Day Special : त्यांच्या प्रेमाला दृष्टीची गरज नाही!

विक्टर आणि कल्पना दोघंही दृष्टीहीन. असं असतानाही दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. अडथळ्यांची शर्यत पार करत दोघेही जीवनाचा गाडा आनंदानं हाकत आहेत.

Valentine Day Special : त्यांच्या प्रेमाला दृष्टीची गरज नाही!
photo grab from video credit - mith mumbaikar
SHARES

दृष्टी नसतानाही त्यांनी एकमेकांना पाहिलं... प्रत्यक्ष न पाहाताही ते एकमेकांना समजले... आणि त्यांनी मिळून प्रेमाचा एक नवा अर्थ जगाला समजावला! प्रेम पाहिल्यानं नाही, तर समजल्यानं होतं... तगतं.. आणि यशस्वी होतं!

ही प्रेमकहाणी आहे विक्टर डिसोजा आणि कल्पना डिसोजा या जोडप्याची. दोघेही लहानपणापासूनच दृष्टीहीन. पण त्यांच्या जाणीवा प्रचंड ताकदीच्या होत्या. हा एकच धागा त्यांना एकत्र घेऊन आला. आणि त्यांच्यातल्या प्रेमाला नवा अर्थ मिळाला.

विक्टर आणि कल्पना दोघंही दृष्टीहीन. असं असतानाही दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. अडथळ्यांची शर्यत पार करत दोघेही जीवनाचा गाडा आनंदानं हाकत आहेत.

विक्टर आणि कल्पना यांची पहिली ओळख २००७ मध्ये झाली. कल्पना या २००७ साली वर्किंग वुमेन हॉस्टेलमध्ये राहत होत्या. दृष्टीहीन महिलांसाठी ते विशेष हॉस्टेल होते. विक्टर कामानिमित्त हॉस्टेमध्ये यायचे. तेव्हा हॉस्टेलमधील एका मैत्रिणीद्वारे त्यांचाशी ओळख करून दिली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

२०१२ साली विक्टर आणि कल्पना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयात त्यांच्या कुटुंबियांनी पण साथ दिली. आता त्यांना एक मुलगी असून प्रिंसिया असे तिचे नाव आहे.

२०१२ साली आम्ही लग्न करण्याचे ठरवले. तेव्हा आमचा निर्णय घरचांना सांगितला. तेव्हा घरच्यांनी विरोध तर नाही केला. पण त्यांना चिंता होती की, आम्ही दोघे दृष्टीहीन संसार कसा करतील. पण त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या लग्नासाठी तयार झाले.

कल्पना डिसोजा

कल्पना आणि विक्टर दोघांनीही पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या दोघेही नोकरी करतात. कल्पना बँकेत कामाल आहेत. तर विक्टर एलआयसी एजंट आहेत. कल्पना यांनी पहिली नोकरी सर्व शिक्षा अभियानात केली. त्यानंतर नॅबमध्ये नोकरी केली. तिकडे त्या दृष्टीहीन व्यक्तींना शिकवायच्या.

मी सकाळीच कामासाठी घरातून निघते. त्यानंतर विक्टरच सर्व जबाबदारी सांभाळतात. मुलीला शाळेतून आणणे, तिला जेवण देणे या सगळ्या जाबाबदाऱ्या विक्टर निभावतात. त्यामुळे त्यांची पूर्ण मदत मला होते. कधी मी थकली असेल ते जेवण देखील करतात.

कल्पना डिसोजा

विक्टर अजिबात याबाबत खोटा अभिमान बाळगत नाहीत.

आम्ही ब्लाईंड स्कूलमध्ये असल्यापासून आम्हाला सर्व शिकवले जाते. जेवणापासून ते छोटी मोठी कामे करण्यापर्यंत आम्हा आत्मनिर्भर बनवले जाते. तर काही गोष्टी मला कल्पनाने शिकवल्या. मला ही त्या गोष्टी शिकवण्यात काही वावगं वाटत नाही.

विक्टर डिसोजा

विक्टर सांगतात की, प्रत्येक नात्यात छोटे-मोठे वाद विवाद होतात. आमच्या नात्यातही तसेच वाद होतात. हे सामान्य आहे. पण आम्ही कधीच ती गोष्ट इगोवर घेत नाही. आज वाद झाले की उद्या ते वाद मिटवून गोडिने नांदतो.

कल्पना आणि विक्टर यांना छोटी मुलगी देखील आहे. काही दिवसांपूर्वीच या तिघांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. व्हिडिमध्ये विक्टर आणि कल्पना यांची मुलगी प्रिंसिया त्यांची खूप काळजी घेताना दिसत होती. एकप्रकारे तीच त्यांचा आधार आहे.

प्रिंसियाला कशामध्ये करियर करायचे आहे हा पूर्ण तिचा निर्णय असेल. पण आम्ही तिला एक चांगली व्यक्ती बनवू. जेणेकरून ती नेहमी दुसऱ्याच्या मदतीला जाईल. अभ्यासामुळे तिला वेळ कमी असतो. पण कधीतरी मी तिला ब्लाईंड कम्युनुटीमध्ये देखील घेऊन जातो, जेणेकरून ती आमच्यासारख्या इतरांना पण समजून घेईल आणि त्यांची मदत करेल.

विक्टर डिसोजा

गेल्या 8 वर्षांपासून दोघंही शारीरिक व्यंगत्वावर मात करत हिमतीनं संसार करत आहेत. दोघांचं मीरारोडला छोटंसं का होईना स्वत:चे घर आहे. दोघांनी खूप प्रेमाने त्यांचे घर सजवले आहे. अगदी बाहेरून येणारी मंडळी देखील दोघांचे कौतुक करून थकत नाहीत.

पण मी लिहिलं आणि आपण वाचलं तितका त्यांचा संसार आणि त्यांचा संघर्ष अजिबात सोपा नाही. किंबहुना, बाहेरून जितका सहज सोपा तो वाटतो, त्याहून कितीतरी जास्त कठीण आणि संयमाची परीक्षा घेणारा आहे. पण त्याला या दोघांची तयारी आहे. नव्हे, त्या तयारीनंच हे दोघे संसारात उतरले आहेत.

एवढं सगळं असूनही, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नियतीचे चटके बसूनही दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. उलट ते अधिकाधिक मजबूत होतंय. अजूनही एकमेकांचा स्पर्श त्यांच्या भावना पोहोच करण्यासाठी पुरेसा ठरतो. ना त्यांना एकमेकांना बघण्याची गरज पडते, ना ऐकण्याची! या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विक्टर  आणि कल्पनाच्या उत्कट प्रेमाला मुंबई लाइव्हचा सलाम!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा