नवश्याचा पाडा अंधाराच्या गुलामगिरीतून स्वतंत्र!

एकिकडे सरकार भारतात विकासाच्या गोष्टी करतं. पण हा विकास नेमका आहे कुठे याचा कुणालाही थांग पत्ता नाही. आरेतील नवश्याच्या पाड्यात गेल्यावर आपल्याला सत्य कळतं. इथं आदिवासींना वीज मिळवण्यासाठी तब्बल ७२ वर्ष संघर्ष करावा लागला. त्यांचीच ही कहाणी...

SHARE

मुंबई म्हटलं की प्रकाशानं उजळून गेलेलं शहर सर्वांच्या डोळ्यापुढे येतं. मात्र याच शहरातला एक भाग गेली अनेक वर्ष अंधारात असल्याचं कुणाला सांगूनही पटणार नाही. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही वीजेविना अंधारात चाचपडणाऱ्या गोरेगावातील आदिवासी पाड्यातील रहिवासी आता अंधाराच्या गुलामगिरीतून मुक्त होणार आहेत. ७२ वर्षानंतर नवश्याच्या पाड्यातील रहिवाश्यांची प्रतिक्षा अखेर संपली... प्रकाश भोईर आणि त्याचा साथ देणाऱ्या अनेक संघटनांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं.


अंधाराच्या गुलामगिरीतून स्वतंत्र

गोरेगाव पूर्वेकडील महानंद डेरीजवळ नवसाचा पाडा नावाचा आदिवासी पाडा आहे. या पाड्यात गेली ७२ वर्ष वीज नव्हती. मुळात हे आदिवासी तिकडे १०० वर्षापासून राहत आहेत. पाड्यातील रहिवाश्यांचा दोन-तीन पिढ्या तिकडे नांदल्यात. पण मुंबईत दूध प्रकल्प उभारण्यासाठी आरे डेरीनं आदिवासींच्या जमिनी घेतल्या. आदिवासींनी देखील दूध प्रकल्पासाठी जमिनी दिल्या. पण ४० वर्षांपूर्वी आरेनं १४५ ऐकर जमीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिली. यात आदिवासी पाड्याच्या जागेचाही समावेश आहे.


७२ वर्ष वीजेच्या प्रतिक्षेत 

आम्ही या जागेवर १०० वर्षांआधीपासून राहतोय. आरे आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय उभं राहण्यापूर्वीपासून आम्ही इथं राहत आलोय. आमच्या तीन पिढ्या एकडे राहिल्यात. पण आज परिस्थिती अशी आहे की, आमच्या नंतर येऊन जागेवर हक्क गाजवणाऱ्या या महाविद्यालयाकडे आम्हाला एनओसीसाठी हातापाया पडावं लागतंय. पुनर्वसनाच्या नावाखाली आम्हाला ४० वर्ष एनओसी दिली नाही. त्यामुळे आमचा पाडा गेली अनेक वर्ष अंधारात आहे.    

- प्रकाश भोईर, कार्यकर्ते, आदिवासी हक्क संवर्धन समिती


आदिवासींच्या लढ्याला यश

पशुवैद्यकीय महाविद्यालयानं एनओसी दिली तरच पाड्यातील ७५ घरांना वीज मिळणार होती. पण पाड्याचं पुनर्वसन करायचं आहे, असं सांगून टाळाटाळ करत असल्याचा आरोप पाड्यातील रहिवाशांनी केला. पण गेल्या ४० वर्षांच्या लढ्याला अखेर यश आलं. आदिवासी हक्क समितीच्या नेतृत्वाखाली २८ मे रोजी आदिवासींनी महाविद्यालयावर मोर्चा काढला.


एनओसी मिळताच जल्लोष साजरा

२००९ पासून आम्ही एनओसी मागत आहेत. पण महाविद्यालय एनओसी नाकारून एकप्रकारे आमच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत होते. अखेर एनओसी न दिल्यास अॅट्रॉसिटीअंतर्गत महाविद्यालयाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा इशारा समिती अंतर्गत आम्ही दिला. तेव्हा कुठे त्यांनी आम्हाला एनओसी दिली.

-राकेश शिगवणगावकरी  

एनओसी हातात पडताच नवसाच्या पाड्यातील आदिवासींनी जल्लोष साजरा केला. एनओसीच्या प्रतीला पालखीत ठेवून हळदकुंकू लावून वाजत गाजत मिरवणूक काढलीअखेर पाड्यात वीज आली

आदिवासींना दिलेली एनओसी अदानी यांच्या कंपनीला दाखवण्यात आली. त्यानंतर पाड्यात विजेच्या कामाला सुरुवात झाली. आज पाड्यातील ५५ ते ६० घरांमध्ये वीज पोहोचली आहे. तर इतर घरांमध्ये देखील लवकरच वीज पोहोचेल.  


वीज आली पण जमिनीचं काय?

वीज आली असली तरी पाड्यातील आदिवासींना आपली जागा जाण्याची भीती आहेच. कारण मेट्रो कारशेडसाठी आदिवासी पाड्यातील काही कुटुंबांचं स्थलांतर दुसऱ्या जागी करण्यात आलं आहे. जे आदिवासी त्या जागी राहत आहेत त्यांना जागा सोडून जाण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही भीतीच्या वातावरमात वावरतो, असं पाड्यातील आदिवासींनी सांगितलं.हेही वाचा

काँक्रिटच्या जंगलात गुदमरतोय आदिवासी


संबंधित विषय
ताज्या बातम्या