Advertisement

Women's Day Special : गोष्ट 'महिला बारटेंडर'ची

Women’s Day निमित्त 'मुंबई लाइव्ह'नं Women's Flair Bar Tender एमी श्रॉफशी बातचित करून तिचा प्रवास जाणून घेतला आहे.

Women's Day Special : गोष्ट 'महिला बारटेंडर'ची
SHARES

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. मेकॅनिक, रेल्वे चालक, कन्डक्टर, रिक्षा चालक, डॉक्टर, रिपोर्टर, इंजिनियर अशा अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रीनं कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीनं आपल्या कामाची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं यात काही शंका नाही. पण एक क्षेत्र असंही आहे जिथे स्त्रीयांचा कल कमी आहे. हे क्षेत्र आहे बार टेंडिंगचं. आता या क्षेत्राला 'मिक्सॉलॉजी' (mixology) असंही म्हटलं जाऊ लागलं आहे.


बार टेंडिग म्हणजे?

बार टेंडर म्हणजे बार गर्ल असाच विचार तुमच्या डोक्यात आला असेल. पण तसं नाही... बार टेंडिंग म्हणजे मद्य असलेली वेगवेगळी पेयं बनवणं. एवढंच नव्हे तर बारमध्ये, पार्ट्यांमध्ये उभी राहून ते मद्य लोकांना सर्व्ह करणं. एवढंच नाही तर जगलिंग म्हणजे मद्याच्या बाटल्यांसोबत काही ट्रिक्स दाखवणं...  अरेरेरे... बार टेंडिंग... अर्थात तुमचे हे उद्गार तोंडून आले असल्यास नवल ते काय? 


समाजाची चौकट मोडून

बरोबरच आहे म्हणा, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पापभीरू मध्यमवर्गीय घरात दारू हा विषय अगदी आताआतापर्यंत पूर्ण वर्ज्य किंवा निषिद्धच आहे. दारू पिणे तर दूरची गोष्ट, पण त्याबद्दल बोलणे देखील बहुतांशी पुरुषांच्यातच तेही कुजबूजतच. स्त्रीयांनी तर विचार पण करायचा नाही, अशी मानसिकत अजूनही आहे. पण समाजाची हीच चौकट मोडण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईतल्या एमी श्रॉफ या तरूणीनं.


दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न

बार टेंडिंगमध्ये आली ती दारूच मग ती दारू सर्व्ह करण्यात कठीण असं काय? लोकांना दारू तर ओतून द्यायची असते. तुमचा हा गैरसमज पहिला दूर करा. वाटतं तितकं ते सोपं नाही. अर्थात वेगवेगळी मद्य त्यांचे गुणधर्म आणि त्यापासून बनवण्यात येणारी पेयं याचे शिक्षण दिलं जातं.

बार टेंडिंग शाळा, अर्थात अशी शाळा जिथं वेगवेगळ्या मद्यांचा आणि पेयांचा अभ्यास केला जातो आणि ती तयार करायला शिकवली जाते. नुसते मद्य आणि सरबत एकत्र करून समोर ग्लासात ठेवणं याला बार टेंडिंग म्हणत नाहीत. तर कोणत्या मद्याबरोबर कोणते पेय जास्त चांगले चवीला लागू शकेल आणि किती प्रमाणात याची जाण ठेवून बार टेंडरला त्याचं पेयं तयार करायचे असतात.   


प्रवाहाच्या विरूद्ध प्रवास

एकप्रकारे एमीनं प्रवाहाच्या विरूद्ध जाऊन समाजाचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा तिनं बऱ्यापैकी समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. Women’s Day निमित्त 'मुंबई लाइव्ह'नं Women's Flair Bar Tender एमी श्रॉफशी बातचित करून तिचा प्रवास जाणून घेतला आहे.

  • फ्लेअर बार टेंडिंगमध्ये करीयर करण्याचा निर्णय कसा आणि केव्हा घेतला?

मी आठवीत शिकत होते तेव्हा टॉम क्रूझचा एक चित्रपट पाहिला. त्यामध्ये टॉम क्रूझ जगलिंग करत होता. चित्रपटात पाहून मी देखील जगलिंग करण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांतच मी त्याच्या जगलिंगच्या तीन ट्रिक शिकली. माझ्यासाठी त्या ट्रिक्स खूप मजेशीर होत्या. तिकडून मला यात इंन्ट्रेस्ट आला.

मग कॉलेजच्या एका इव्हेंटमध्ये मी पुरुष बार टेंडरला भेटले आणि तिकडूनच माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर २००३ साली मी प्रत्यक्षात या क्षेत्रात उतरली. तेव्हा मी १८ वर्षांची होती. मी यासाठी प्रोपर बार टेंडिंग शिकण्यासाठी शाळेत नाही गेली. तर वेगवेगळे इव्हेंट अटेंड करून दिग्गज बार टेंडरकडून हे शिकले आहे.

सुरुवातीला मी एका बार टेंडरला असिसट करायचे. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. हळूहळू मला देखील इव्हेंट मिळू लागले. तिथून सुरू झालेला माझा प्रवास आज फ्रिलँसिंगपर्यंत येऊन थांबवा आहे.


  • फ्लेअर और मॅक्सॉलॉजी संदर्भात काही सांगा?

फ्लेअर बार टेंडिंगमध्ये काही ट्रिक्स वापरून वेगवेगळी कॉकटेल्स लोकांना सर्व्ह करणं. फक्त फ्लेअर बार टेंडिंग नाही तर यात मी पफॉर्म देखील करते. त्यामध्ये जगलिंग बॉलसोबत मी काही कर्तब दाखवते. त्यानंतर फायर बॉटल जगलिंगसोबत मी कर्तब करते. त्याला फायर प्ले पण बोलतात.   

  • असं बोललं जातं की हे क्षेत्र फक्त पुरुषांसाठीच आहे. मग तू स्वत:ला कसं सिद्ध केलंस?

मी कधी असा विचार केलाच नाही. त्यामुळे मला कधी हे सिद्ध करावं लागलंच नाही. फक्त पुरुषांचंच हे क्षेत्र आहे हे कधी सिद्धच नाही झालं. कोणतंच क्षेत्र हे एका ठराविक जेंडरसाठी नसतं. स्त्री असो, पुरुष असो वा ट्रान्स जेंडर असो कोणीही या क्षेत्रात करीयर करू शकतं.  

  • आज तुम्ही या क्षेत्रात नाव कमवलं आहे. यामागे तुझी किती मेहनत आहे?

मेहनत तर प्रचंड आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीत इंट्रेस्ट आहे. मग तुम्हाला त्यासाठी वेगळं असं काही करावं नाही लागत. ते होऊन जातं. पण जरं तुम्ही ते फक्त एक काम आहे आणि आपण केलंच पाहिजे, असा समज ठेऊन केलंत तर ते खूप कंटाळवाणं होऊन जातं. करायचं म्हणून केल्यासारखं ते होतं.

मला या सर्वाची आवड होती. त्यामुळे मला त्यावर असं खूप काम नाही करावं लागलं. तुम्हाला कोणती गोष्ट करायला आवडत असेल तर ती करत राहायची. भविष्यात काय होईल याचा जास्त विचार करायचा नाही. तुमची वैचारिक शक्ती तुमच्या कामात लावा.  

  • तुमच्या कुटुंबियांना जेव्हा याबद्दल कळालं तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला की विरोध केला?

सुरुवातीला माझ्या कुटुंबियांना याबद्दल मी काहीच सांगितलं नव्हतं. माझ्या वडिलांच्या मित्रानं एका इव्हेंटमध्ये जगलिंग करताना पाहिलं. त्यांनीच माझ्या वडिलांना याबद्दल सांगितलं. पण माझे बाबा मला ओरडले नाहीत. त्यांनी फक्त तू नेमकं काय करतेस? हे क्षेत्र कसं आहे? याबद्दल चौकशी केली.

भारतात महिला जास्त सुरक्षित नाहीत. त्यात मी बार टेंडर म्हणून काम करत होती. त्यामुळे त्यांना अधिक चिंता होती. जेव्हा त्यांना कळालं की या क्षेत्रात मी सुरक्षित आहे. माझ्यासोबत चांगले लोकं काम करत आहेत का? त्यांच्यापासून मला काही धोका नाही ना? याबाबत ते माहिती ठेवायचे. माझे कुटुंब फार ‘कुल’ आहे.

मी मुलगी असून या क्षेत्रात काम करणार, लोकांना दारू सर्व्ह करणार, समाज काय विचार करेल? या बद्दल त्यांचा काहीच आक्षेप नव्हता. असा विचार आमच्या कुटुंबामध्ये कधी नव्हताच. त्यांचा पूर्ण विश्वास माझ्यावर आहे. त्यामुळे मला माझ्या वडिलांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मुलीं कुठल्याही क्षेत्रात काम करूदेत पण त्यांना पाठिंबा देणं आवश्यक आहे. पाठिंबा देता नाही आला तरी नाराज तरी नाही झालं पाहिजे.        

  • जेव्हा लोकं तुला फ्लेअर बार टेंडिंग करताना बघायचे तेव्हा त्यांची रिएक्शन कशी असायची?

वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. अनेकांना मी जे काही करते ते ‘कुल’ वाटतं. खूप जणांना ते इंटरेस्टिंग वाटतं. तू हे कंस सुरू केलं? कधीपासून करते? असे प्रश्न मला विचारले जातात. त्यांना पण माझ्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुक्ता असते.

कधी-कधी नकारात्मक प्रतिक्रिया येतात. मला कुणी हे का करताय? किंवा काय गरज आहे? असं कुणी आतापर्यंत विचारलं नाही. पण त्यांच्या हावभावावरून ते कळून येतं. ती लोकं फक्त जज करतात. त्यांच्यासाठी मी एवढंच सांगते की, असे प्रोफेशन्स आहेत ज्या स्त्री करत आहेत. अनेक वर्षांपासून करत आहेत. माझं या क्षेत्रात काम करणं त्यांना अनकमफर्टेबल करत असेल तर याचा मला आनंद आहे.      

  • या क्षेत्रात कधी जेंडरवर आधारीत भेदभावचा सामना केला आहे का?

मला वाटतं जन्मापासून ते मरणापर्यंत स्त्रीयांसोबत भेदभाव होतो. चालण्यावर, बोलण्यावर, बसण्यावर आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला जातो. महिलांना अनेक निर्बंध असतात. पण पुरुषांना सगळं माफ असतं. पुरुषांना खरं स्वातंत्र्य असतं. अजूनही समानता आली नाही. घरात आणि बाहेर अजून स्त्री-पुरुषांमध्ये समानता आली नाही. हे तुम्हाला सगळीकडे दिसेल.

मला काय सगळ्या स्त्रीयांना असा अनुभव येत असेल. स्त्रीयांकडून ऑर्डर घेणं अनेक पुरुष लज्जास्पद मानतात. एखाद्या स्त्री यशस्वी झाली तर तिनं काही तरी कॉप्रोमाईज केला असेल, हे देखील बोललं जातं. कामाच्या ठिकाणी स्त्री पुढे गेलेलं अनेकांना सहन होत नाही. त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न होतो.

बार टेंडिंगमध्ये स्त्रीयांच्या बाबतीत मी अनेकदा ऐकलं आहे की, स्त्रीयांना जास्त काही मेहनत करावी लागत नाही आणि त्यांना चांगला पैसे दिला जातो. पण हे खरं नाही. आम्हाला अशा वातावरणात काम करायचं असतं जिथे पुरुषांची संख्या जास्त आहे आणि महिला फारच कमी. त्यामुळे मेहनत नाही हे बोलणं चुकिचं आहे.         

  • या क्षेत्रात आलीस तेव्हा किती महिला होत्या? आता परिस्थितीत बदल झाला आहे का?

हाताच्या बोटावर मोजावीत एवढ्याच महिला बार टेंडर म्हणून आहेत. पण आता परिस्थिती बदलत आहे. भविष्यात आणखी सुधारणा होईल असा विश्वास आहे मला.   

  • फ्लेअर बार टेंडिंगमध्ये करीयर करू पाहणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?

जर तुम्हाला यात इंट्रेस्ट असेल तर नक्की या क्षेत्रात या. बिनधास्त काम करा. कोण काय बोलतं? याचा विचार करू नका. जस्ट रॉक...  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा