Advertisement

भारत श्री स्पर्धेत महाराष्ट्राचे २० खेळाडू पदकांच्या शर्यतीत


भारत श्री स्पर्धेत महाराष्ट्राचे २० खेळाडू पदकांच्या शर्यतीत
SHARES

भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या भारत श्री स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाहुबलींची पीळदार करामत प्राथमिक फेरीत पाहायला मिळाली. विक्रमी ५८४ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेतून अंतिम फेरीसाठी १२८ खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यापैकी दहा गटात खेळल्या गेलेल्या पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वाधिक २० खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.


महाराष्ट्र सांघिक विजेतेपदाचा दावेदार

भारतीय शरीरसौष्ठवात महाराष्ट्राची वाढलेली ताकद भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या २० जणांनी अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे यंदाचे सर्वसाधारण सांघिक विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अॅड. विक्रम रोठे त्यांनी व्यक्त केला.

कौन कितने पानी में

५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या संदेश सकपाळ आणि नितीन शिगवण यांच्यात काँटे की टक्कर होणार यात वाद नाही. ६० किलो वजनी गटात मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेला सुवर्ण पदकाची संधी आहे. या गटात प्रतिक पांचाळही टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळवू शकतो. ६५ किलो वजनी गटात श्रीनिवास खारवीने टॉप फाइव्हमध्ये स्थान मिळविले तरी ती मोठी गोष्ट असेल. ७० किलो वजनी गटात रितेश नाईककडून महाराष्ट्राला एका पदकाची अपेक्षा आहे.

सागर कातुर्डेकडून पदकाची अाशा

महाराष्ट्रासाठी हमखास पदक ७५ किलो वजनी गटात सागर कातुर्डे मिळवून देऊ शकतो. फक्त ते पदक सोन्याचं असणार की चांदीचं हे अंतिम फेरीतच कळू शकेल. ८५ किलो वजनी गटात महाराष्ट्राची धुरा अजय नायर याच्यावर आहे.

सुनीत जाधवचा कस लागणार

महाराष्ट्राचा खरा कस ९० किलो वजनी गटात लागणार आहे. या गटात सलग दोनदा भारत श्री जिंकणाऱ्या सुनीत जाधवला गटविजेतेपदासाठी महाराष्ट्राच्याच महेंद्र चव्हाण, रोहित शेट्टीशी भिडावे लागणार आहे. त्याचबरोबर रेल्वेचा सागर जाधव आणि उत्तर प्रदेशच्या विजय बहादूरचे कडवे आव्हानही त्याला परतावून लावावे लागणार आहे.

संभाव्य विजेत्यांमध्ये चुरस

९०-९५ किलो वजनी गटात स्पर्धेचे संभाव्य विजेते एकत्र भिडणार आहेत. महाराष्ट्राचा महेंद्र पगडे, रेल्वेचा रामनिवास, उत्तराखंडचा अमित छेत्री यापैकी एक गटविजेता असेल आणि स्पर्धेचा विजेताही. १०० किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रपैकी एकाला पदक निश्चित आहे. त्यामुळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्समध्ये सुनीतला जेतेपदाची हॅटट्रिक साधणे मुश्किलीचे बनले अाहे.

महिलांची ताकद वाढली...

शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता. महिलांच्या स्पर्धेत आठ पीळदार महिलांची उपस्थिती स्फूर्तीदायक होती. या गटात देशभरातून आलेल्या ३५ महिला खेळाडूंची पीळदार देहयष्टी आणि सुडौल बांधा पाहून सारेच थक्क झाले.


हेही वाचा -

'भारत श्री' विजेत्यांना मिळणार ५० लाखांची बक्षिसं

भारत श्री स्पर्धेत मुंबईकरांवर सर्वांच्या नजरा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा