Advertisement

जायंट स्टारकेन मुंबई-पुणे सायकल शर्यतीचा थरार २५ मार्चला


जायंट स्टारकेन मुंबई-पुणे सायकल शर्यतीचा थरार २५ मार्चला
SHARES

सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २५ मार्च २०१८ रोजी मुंबई-पुणे सायकल शर्यतीचा थरार अनुभवता येणार आहे. भारतामध्ये प्रतिष्ठेची व अत्यंत खडतर समजल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील शर्यतीत विजेत्या सायकलपटूंवर यंदा सहा लाख २५ हजार रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार अाहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम देणारी ही देशातील एकमेव सायकल शर्यत आहे. गेल्या वर्षीपासून ही शर्यत मुंबई ते खंडाळा अाणि खंडाळा ते पुणे अशा दोन टप्प्यात खेळविण्यात येते. दोन्ही टप्प्यांची वेळ एकत्र करून या शर्यतीचा विजेता घोषित करण्यात येतो.


घाटाचा राजा २५ हजारांचा मानकरी

पनवेल, खोपोली या टप्प्यावर प्रथम येणाऱ्या तीन सायकलपटूंना रोख पारितोषिके तसेच अत्यंत खडतर असा बोरघाट प्रथम पार करणाऱ्यास घाटाचा राजा या किताबाने तसेच २५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार अाहे. त्याचबरोबर घाटात प्रथम येणाऱ्या १० सायकलपटूंना ९० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. खंडाळा ते पुणे या टप्प्यातील पहिल्या १० क्रमांकाच्या विजेत्यांना ७५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. मुंबई-पुणे सायकल शर्यतीच्या किताब विजेत्यास एक लाख रुपये अाणि चषक देऊन गौरवण्यात येईल.


शर्यतीचा मार्ग असा असेल...

मुंबईतील काळाघोडा येथील के. दुभाष मार्गावरून शर्यतीला सकाळी ७ वाजता सुरुवात होईल. पुढे रिगल सिनेमा-गेटवे अाॅफ इंडिया- ताज हाॅटेल- छत्रपती शिवाजी टर्मिनस- भायखळा- काळाचौकी, लालबाग- परळ- दादर- माटुंगा येथून चेंबूर नाका, वाशी टोल नाका- पामबीच मार्गे- कोकण भवन- पनवेल- खोपोली- बोरघाट- शिंग्रोबा-राजमाची मार्गे खंडाळा- लोणावळा- कार्ला- कामशेत गावाबाहेरून वडगांव- चिंचवड- पिंपरी- खडकीमार्गे इंजनिअरिंग चौक- जंगली महाराज मार्गावर संभाजी उद्यान असा या शर्यतीचा मार्ग असेल.


किती स्पर्धकांचा सहभाग?

आतापर्यंत १५७ स्पर्धकांनी या शर्यतीत सहभाग निश्चित केला आहे. यात महाराष्ट्राच्या स्पर्धकांसह राजस्थान, कर्नाटक, मध्य रेल्वे, दक्षिण-मध्य रेल्वे, सेनादल, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या सायकलपटूंचा सहभाग असेल.


हेही वाचा -

मुंबई-खंडाळा सायकल शर्यतीचा थरार

वरळी ते चर्चगेटदरम्यान सायकल चालवा सुसाट!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा